नवी दिल्ली: कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला धक्का दिला. पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजूनं निकाल दिला. जाधव यांच्या शिक्षेला देण्यात आलेली स्थगिती न्यायालयानं कायम ठेवली आहे. याशिवाय जाधव यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश पाकिस्तानला न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. पाकिस्ताननं या खटल्यात २६/११ हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा संदर्भ दिला. मात्र यामुळे पाकिस्तान फसला.पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयात मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अजमल कसाबचा उल्लेख केला. कसाबची तुलना कुलभूषण यांच्याशी करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. भारतातही सैन्याच्या न्यायालयात सुनावणी घेतली जाते, असा युक्तिवाद पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र भारतानं पाकिस्तानचा खोटेपणा न्यायालयासमोर उघड केला. कसाबवरील खटल्याची सुनावणी न्यायालयात लाईव्ह झाली होती, हे भारताकडून स्पष्ट करण्यात आलं. 'कसाबचा खटला लढवण्यासाठी स्वतंत्र वकील देण्यात आला होता. एका माजी सॉलिसिटर अॅडिशनल जनरलनं न्यायालयात कसाबची बाजू मांडली. निष्पक्ष सुनावणीसाठी भारतानं सर्व प्रकारचे प्रयत्न केले. अनेकदा सर्वसामान्य भारतीयाला जी न्यायालयीन मदत मिळत नाही, ती कसाबला देण्यात आली,' हे भारतानं पुराव्यासह न्यायालयाला पटवून दिलं. 26 नोव्हेंबर २००८ ला लष्कर ए तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला. त्यामध्ये कसाबचा समावेश होता. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात परदेशी नागरिकांसह १६५ जणांचा मृत्यू झाला. कसाबला मुंबईतील न्यायालयानं दोषी ठरवलं. सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठरवली. पुण्यातील येरवडा कारागृहात कसाबला फाशी देण्यात आली.
Kulbhushan Jadhav: न्यायालयात कसाबचा संदर्भ दिला अन् पाकिस्तान फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 3:21 PM