पराभवाच्या धक्क्यामुळे लालूप्रसाद यांचा भोजनत्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:44 AM2019-05-28T04:44:04+5:302019-05-28T04:44:18+5:30
रांची येथील रुग्णालयात दाखल असलेले लालूप्रसाद यादव लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून अस्वस्थ असून, त्यांनी दोन दिवस दुपारचे जेवणही घेतले नाही.
पाटणा : रांची येथील रुग्णालयात दाखल असलेले लालूप्रसाद यादव लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून अस्वस्थ असून, त्यांनी दोन दिवस दुपारचे जेवणही घेतले नाही. त्यामुळे डॉक्टर मंडळी चिंताग्रस्त आहेत. चारा घोटाळ्याबद्दल राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद याव यांना शिक्षा झाली आहे.
बिहार आणि झारखंडमध्ये राजदचा दारुण पराभव झाला. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास लालूप्रसाद यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. हे समजताच डॉ. उमेश प्रसाद व डॉ. डी. के. झा यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला. तो सामान्य होता. रक्तातील साखरेचे प्रमाण काहीसे वाढले होते. रक्तदाब, मधुमेह
आणि मूत्रपिंडाच्या विकारामुळे आजारी असलेल्या लालूप्रसाद यांच्यावर रांची येथील रुग्णालयात डिसेंबर २०१७ पासून उपचार सुरू आहेत.
नेहमी हसतमुख असलेले लालू त्यांच्या विनोदांबद्दल चांगलेच प्रसिद्ध आहेत. एकेकाळी त्यांचे साम्राज्य असलेल्या बिहार आणि शेजारील झारखंडमध्ये त्यांच्या पक्षाचे नावही राहिलेले नाही. राष्ट्रीय जनता दलाला १९९७ नंतर प्रथमच बिहारमध्ये एकही जागा मिळू शकलेली नाही. झारखंडमध्ये पक्षाला सलग दुसऱ्यांदा खाते उघडता आलेले नाही. महाआघाडीतर्फे राजदने १९ जागा लढविल्या होत्या. लालूंच्या कन्या मिसा भारती यांचाही पाटलीपुत्र मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा पराभव झाला.
सारण मतदारसंघातही लालू यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय हेही पराभूत झाले. बिहारमधील ४० मतदारसंघांपैकी केवळ किशनगंजमध्ये महाआघाडीतील कॉँग्रेसचा उमेदवार निवडून आला. (वृत्तसंस्था)
>लालूप्रसाद नसल्याने फटका
राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, काय चुकले आहे, यावर सविस्तर विचारमंथन केले जाईल. मात्र लालूप्रसाद यांच्या अनुपस्थितीचा मोठा फटका पक्षाला बसला आहे. पक्षाला पराभवातून धडा मिळाला. मात्र पक्षनेतृत्व पक्षाची पूर्वीची ताकद मिळविण्यासाठी विचार करेल.