लालू प्रसाद यादव गमावणार 128 कोटींची मालमत्ता; IT ने दिला 'जोर का झटका'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 12:12 PM2018-10-23T12:12:20+5:302018-10-23T12:49:51+5:30
चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पाटणा - चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण लालू प्रसाद यादव आणि कुटुंबियांच्या नावे पाटणा आणि दिल्लीतील अलिशान परिसरात असलेली मालमत्ता लवकरच जप्त होण्याची शक्यता आहे. नवीन बेनाम संपत्तीच्या कायद्याअंतर्गत मालमत्तेसंदर्भात लालूंना आयकर विभागाने नोटीस दिली आहे. लालूंची तब्बल 128 कोटींची मालमत्ता असून ती लवकरच जप्त होण्याची चिन्ह दिसत आहेत.
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना शेल कंपन्यांच्या मार्फत त्यांच्या नातेवाइकांनी ही मालमत्ता अत्यंत कमी किमतीत खरेदी केली होती. त्यानंतर ही मालमत्ता लालू प्रसाद यादव यांनी त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलांच्या नावावर करून घेतली होती. आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लालूंच्या या मालमत्तेची एकूम किंमत ही तब्बल 127.75 कोटी आहे. या मालमत्तेत पाटण्यात तयार होत असलेला एक मॉल, दिल्लीतील आलिशान बंगला आणि दिल्ली एअरपोर्ट जवळचे एक शेत इतक्या गोष्टींचा समावेश आहे.
बेनाम संपत्तीच्या कायद्याअंतर्गत लालू प्रसाद यादव दोषी आढळल्यास त्यांना 7 वर्षाचा तुरुंगवास आणि मालमत्तेच्या बाजारभावानुसार असलेल्या एकूण किंमतीच्या 25 टक्के हिस्सा दंड म्हणून भरावा लागेल. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवलं आहे. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालू प्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलं होतं. दुमका, देवघर आणि चायबासा कोषागरांचा यामध्ये सहभाग होता.