दहशतवाद सोडून लष्करात दाखल झालेला लान्स नायक नझीर वानी चकमकीत शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 04:48 PM2018-11-27T16:48:58+5:302018-11-27T17:02:30+5:30
सध्या काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून जोरदार कारवाई सुरू आहे.
श्रीनगर - सध्या काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराकडून जोरदार कारवाई सुरू आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे 20 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे. या चकमकीदरम्यान भारतीय लष्करामधील काही जवानांनाही वीरमरण आले. या शहीद झालेल्या जवानांपैकी एक नाव आहे लान्स नायक नझीर अहमद वानी. नझीरने एकेकाळी दहशतवाद्यांसोबत बंदूक उचलली होती. त्यानंतर आत्मसमर्पण करून तो लष्करात दाखल झाला होता. लष्करी सेवेदरम्यान दाखवलेल्या शौर्यासाठी 2007 साली त्याला सेना मेडलही प्रदान करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार नझीर वानी हा काश्मीरमधील कुलगाम येथील अश्मुजी गावातील रहिवासी होता. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्हा दहशतवाद्यांच्या गड मानला जातो. दरम्यान, लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की लान्स नायक नझीर अहमद वानी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.
General Bipin Rawat #COAS & all ranks salute supreme sacrifice of Lance Naik Nazir Ahmad Wani, SM* & offer sincere condolences to the family. #BraveSonsOfIndia@PIB_India@SpokespersonMoD@HQ_IDS_Indiapic.twitter.com/vYpYEwseOu
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) November 26, 2018
नझीर वानी यांनी 2004 साली टेरिटोरियल आर्मीमधून आपल्या सेवेची सुरुवात केली होती. दरम्यान, सोमवारी त्यांना सुपुर्द ए खाक करण्यापूर्वी 21 तोफांची सलामी दिली गेली. लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील करपान भागात असलेल्या हिपुरा बाटागुंड गावात झालेल्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.