शिमला: सध्या हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनासह विविध घटना घडत आहेत. यातच आता पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये एक बहुमजली इमारतीचे काही क्षणातच ढिगाऱ्यात रुपांतर झाले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
ही घटना शिमल्यातील कच्छी घाटी परिसरात घडल्याची माहिती मिळत आहे. परिसरात अतिवृष्टीनंतर अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. या भूस्खलनामुळे एक बहुमजली इमारत कोसळण्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या इमारतीला आधीच धोका निर्माण झाला होता, म्हणून इमारतीमधील लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले होते. परंतु मालमत्तेच्या नुकसानीमुळे इमारतीच्या मालकाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, भूस्खलनामुळे या इमारतीचे नुकसान झालेच पण, या इमारतीमुळे इतर दोन इमारतींचेही मोठे नुकसान झाले. या बहुमजली इमारतीच्या समोर दोन घरे होते, ही बहुमजली इमारत त्या घरांवर कोसळल्यामुळे ती दोन घरेही जमीनदोस्त झाली. तसेच, इमारतीच्या अजुबाजुला असलेल्या हॉटेलसह इतर दोन बहुमजली इमारतींना धोका निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेश सरकारने या घटनेच्या कारणांचा शोध घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.