लंकेशचा मारेकरी ‘सनातन’चाच, गुजरातमध्ये होणार नवीन कुमारची नार्को टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:31 AM2018-04-04T01:31:18+5:302018-04-04T05:49:37+5:30
ज्येष्ठ कन्नड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला कट्टर के. टी. नवीन कुमार (३७) याने सनातन संस्था व तिच्याशी संलग्न हिंदू जनजागरण समितीच्या बंगळुरू, मद्दुर, तसेव गोव्याच्या फोंडा येथे झालेल्या पाच बैठकांना हजेरी लावल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
बंगळुरू - ज्येष्ठ कन्नड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेला कट्टर के. टी. नवीन कुमार (३७) याने सनातन संस्था व तिच्याशी संलग्न हिंदू जनजागरण समितीच्या बंगळुरू, मद्दुर, तसेव गोव्याच्या फोंडा येथे झालेल्या पाच बैठकांना हजेरी लावल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. दरम्यान, नवीन कुमारची गुजरातमध्ये नार्को टेस्ट करण्याचा निर्णय एसआयटीने घेतला आहे. यासाठी कुमारने सहमती दर्शविली आहे.
गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांच्या घराबाहेर बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. विशेष तपास पथकाने नवीन कुमारला दक्षिण कर्नाटकातील मद्दुर येथून अटक केली होती. या हत्येची योजना व अंमलबजावणीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा तपास संस्थेने केला आहे.
नवीन कुमार सनातन आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधीत आहे. नरेंद्र दाभोळकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येशी या संस्थांतील काही संशयितांची नावे यापूर्वीच पुढे आली आहेत. नवीन कुाारने सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या पाच बैठकांना हजेरी लावली होती. फोंडा येथील हिंंदू अधिवेशनातही तो सहभागी होता. सनातनचे मुख्यालयही तिथेच आहे. (वृत्तसंस्था)
जुलैमध्येच रचला कट?
बंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये जुलै २०१७ मध्ये झालेल्या हिंदू जनजागृती समितीच्या आंदोलनात नवीन कुमार सहभागी होता. तिथेच त्याने गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचला होता काय? याचा तपास आता सुरू आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी तो बंगळुरूमध्ये होता.