सैन्यदलात 1522 जागांची मोठी भरती, 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:02 AM2020-09-01T11:02:26+5:302020-09-01T11:09:06+5:30
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठी पोलीस भरती न निघाल्यामुळे तरुणांचा अपेक्षा भंग झाला आहे. मात्र, राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून उमेदवारांना ही चांगली संधी आहे. त्यातच, सशस्त्र सीमा दलाानेही 1522 जागांसाठी अर्ज मागवले आहेत
मुंबई - पोलीस भरती आणि सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सशस्त्र सीमा दलात नोकरीची चांगली संधी आहे. सशस्त्र सीमा दलाकडून हवालदार पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे, भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे नोकरी मिळविण्यासाठी चांगला पर्याय आहे. राज्य सरकारने डिसेंबरपर्यंत राज्यात तब्बल 12 हजार जागांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, उमेदवारांची तयारी सुरू आहे.
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोठी पोलीस भरती न निघाल्यामुळे तरुणांचा अपेक्षा भंग झाला आहे. मात्र, राज्यात लवकरच पोलीस भरती होणार असून उमेदवारांना ही चांगली संधी आहे. त्यातच, सशस्त्र सीमा दलाानेही 1522 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. वय वर्षे 18 ते 27 पर्यंतच्या पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येईल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांचा केंद्र सरकारच्या गृह खात्यांतर्गत असलेल्या सरकारी नोकरीत समावेश होईल. या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये प्रतिमाह वेतन मिळणार आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना देशात कुठेही नोकरीसाठी पाठविण्यात येईल. दलाकडून निघालेल्या 1522 जागांमध्ये आर्थिक मागास आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी असणार आहे. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निवृत्त सैन्य दलातील वारसांना व महिलांना मोफत अर्ज करता येईल. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी 10 सप्टेंबरपर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.