श्रीनगर : जम्मू - काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए- तय्यबाचा कमांडर वसीम शाह आणि त्याचा साथीदार यांना शनिवारी ठार मारण्यात आले. दक्षिण काश्मीरमध्ये गतवर्षी जी अशांतता पसरली होती त्यामागे वसीम हाच मास्टरमाइंड होता, असे सांगितले जाते.वसीम (२३) उर्फ अबू ओसामा भाई याला पुलवामाच्या लिट्टर भागात मारण्यात आले. अतिरेक्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून या भागाला ओळखले जाते. लिट्टरमध्ये गत चार वर्षातील ही पहिली दहशतवादविरोधी मोहीम आहे. जम्मू - काश्मीर चेपोलीस वसीमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्याला ‘हेफ्फचा डॉन’म्हणूनही ओळखले जात होते. ही जागा दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात आहे. अतिरेक्यांचा हा पारंपारिक गड आहे.वसीम लिट्टर भागात लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या विशेष पथकाने या भागाला घेरले. वसीम आणि त्याचा अंगरक्षक निसार अहमद मीर याने या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, सीआरपीएफ व सैन्य दाखल झाल्याने येथून पळून जाण्यात त्यांना यश आले नाही व या चकमकीत हे दोघेही मारले गेले.सुरक्षादलावर दगडफेक : काश्मिरात ही चकमक सुरु असताना या ठिकाणी गुलजार अहमद मीर या व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, ही चकमक सुरु असताना या व्यक्तीला गोळी लागली. तर, स्थानिक लोकांनी असा आरोप केला आहे की, आंदोलकांविरुद्ध सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात या व्यक्तीचा मृत्यू झाला. या चकमकीनंतर लोकांच्या एका समूहाने सुरक्षादलावर दगडफेक सुरु केली. सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत सहा जण जखमी झाल्याचा दावाही लोकांनी केला.कोण होता वसीम?शोपियातील हेफ्फ येथील निवासी वसीम शाह हा २०१४ मध्ये अतिरेकी गटात सहभागी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, तो शाळेत असतानाही तय्यबाचा समर्थक होता. त्याने संघटनेसाठी कुरियर बॉय म्हणूनही काम केले आहे. या अतिरेकी संघटनेसाठी तो भरतीही करत होता. त्याच्या डोक्यावर १० लाखांचे इनाम होते. दक्षिण काश्मिरात सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यामागे त्याचा हात होता.
लष्कर-ए-तय्यबाच्या २ अतिरेक्यांचा खात्मा; कोण होता वसीम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 11:52 PM