मोदी सरकारच्या 5 वर्षांत 6 लाख भारतीयांनी स्वीकारलं विदेशी नागरिकत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:13 AM2021-12-01T10:13:06+5:302021-12-01T10:16:06+5:30
गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली - देशातील 6 लाख नागरिकांनी गेल्या 5 वर्षात भारताचे नागरिकत्व सोडून विदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे. मंगळवारी सरकारनेच लोकसभेत ही माहिती दिली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत माहिती दिली. विदेश मंत्रालयाजवळ असलेल्या माहितीनुसार, 1 कोटी 33 लाख 83 हजार 718 भारतीय नागरिक विदेशात वास्तव्यास आहेत.
विदेशात असलेल्या 1 कोटी 33 लाख नागरिकांपैकी 2017 मध्ये 1,33,049 नागरिकांनी, 2018 मध्ये 1,34,561 लोकांनी, सन 2019 मध्ये 1,44,017 जणांनी, 2020 मध्ये 85,248 नागरिकांनी आणि 2021 मध्ये 30 सप्टेंबरपर्यंत 1,11,287 भारतीयांनी देशाचं नागरिकत्व सोडलं आहे. लोकसभेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे, देशातील तब्बल 6 लाख नागरिकांनी विदेशी नागरिकत्व स्विकारत इंडियाला गुड बाय केलं आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं की, गेल्या 5 वर्षात 10,645 लोकांनी भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये, 4177 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं आहे. भारतीय नागरिकत्वतेसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये 227 अमेरिकेचे, 7782 पाकिस्तानचे, 795 अफगाणिस्तानचे आणि 184 बांग्लादेशच्या नागरिकांचा समावेश आहे. मंत्री राय यांनी सांगतिले की, सन 2016 मध्ये 1106 जणांना भारतीय नागरिकता प्रदान करण्यात आली. तर 2017 मध्ये 817, 2018 मध्ये 628, 2019 मध्ये 987 लोकांना आणि 2020 मध्ये 639 जणांना भारत देशाचं नागरिकत्व देण्यात आलं आहे.