जालौन - देशात होत असलेल्या इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. वाहनचालकांच्या खिशाला मोठा आर्थिक भार पडला आहे. त्यामुळे, इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देत दुचाकी वाहनांच्या खरेदीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, अनेकजण नाना प्रयोग करुन पेट्रोलपासून सुटका होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एका 5 वी शिकलेल्या युवकाने पेट्रोलवर चालणाऱ्या बाईकचे रुपांतर चक्क गॅसवर केले आहे. विशेष म्हणजे 1 किलो गॅसमध्ये ही बाईक 100 किमी अंतर पार करते, असा दावाही त्याने केला आहे.
उत्तर प्रदेशच्या जालौन जिल्ह्यातील कैथवा गावांत राहणारा दिनेश दिल्लीत सीएनजी ऑटो रिक्षा चालवत होता. त्यामुळे, जर मोठे वाहन गॅसवर चालत असेल तर दुचाकी का चालू शकत नाही? असा प्रश्न त्याच्या मनात आला. त्यातूनच सुरु झाला, या नव्या संशोधनाचा प्रवास. त्यानंतर दिनेशने यासंबंधीत माहिती घेत अनेकांच्या गाठीभेट, गॅरेजवाल्यांचाही सल्ला घेतला. अखेर, मनातील संकल्पना सत्यात उतरविण्यात दिनेशला यश आले आणि त्याने गॅसवर धावणारी दुचाकी निर्माण केली. त्यामुळे, हा नवीन शोध लोकांना नक्कीच दिलासा देणारी आहे.
दिनेशने आपल्या स्वत:च्या दुचाकी बाईकवरच हा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे पेट्रोल दरवाढीच्या सध्याच्या काळात गॅसवर चालणारी ही दुचाकी 100 किमीचा मायलेज देत आहे. 1 किलो गॅसमध्ये 100 किमीचा प्रवास प्रवाशांना करता येईल. दिनेश हे यापूर्वी दिल्लीत रिक्षा चालवत असे, पण काही वर्षांपूर्वी ते गावी परतले आणि त्यांनी मनातील ही कल्पना सत्यात उतरविण्यासाठी धडपड सुरु केली. यासाठी गाडीला एक गॅसकीट बसविण्यात आले आहे. ते गॅसकीट सहसा बाजारात उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते बाहेरुन मागविण्यात आले होते, असेही दिनेशने सांगितले.