Eknath Shinde: लवकरात लवकर आसाम सोडा! बदनाम होतोय; स्थानिक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा एकनाथ शिंदेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:57 PM2022-06-24T12:57:42+5:302022-06-24T13:01:42+5:30
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सूरतमधून आसामच्या गुवाहाटीला हलविले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गट आसाममध्ये तळ ठोकून आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सूरतमधून आसामच्या गुवाहाटीला हलविले आहे. यावरून आता आसामकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेन कुमार बोराह यांनी पत्र लिहिले असून एकनाथ शिंदेंना लवकरात लवकर आसाम सोडण्याचा इशारा दिला आहे.
संवैधानिक मूल्ये आणि निष्ठा यांचा अजिबात आदर नसलेल्या आमदारांसाठी गुवाहाटी हे सुरक्षित असल्याची प्रतिमा देशभरात जात आहे. तुमच्या उपस्थितीमुळे आसामची बदनामी झाली आहे. यामुळे आसामच्या भल्यासाठी बंडखोर आमदारांनी लवकरात लवकर आसाम सोडावे, असा इशारा बोराह यांनी पत्राद्वारे दिला आहे.
Assam Congress chief Bhupen Kumar Borah in his letter to Eknath Shinde -"Assam defamed by your presence considering Guwahati as a safe heaven for MLAs who have no respect for constitutional values and loyalty at all."
— ANI (@ANI) June 24, 2022
आसाममध्ये विनाशकारी पूरपरिस्थिती आहे आणि पुरेशा पूर मदतीअभावी पूरग्रस्त लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 6 एप्रिलपासून पूर आणि भूस्खलनात एकूण 107 लोक मरण पावले आहेत, त्यापैकी 14 जूनपासून केवळ 65 लोक आणि 35 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांतील 55 लाख लोकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती, सरकार पाडण्यासाठी घोडे बाजाराच्या आरोपाखाली गुवाहाटीतील हॉटेलमध्ये राहणे आसामच्या हिताचे नाही, असे या पत्रात म्हटले आहे.
राज्याच्या अशा गंभीर आणि दयनीय परिस्थितीत, गुवाहाटीमधील तुमची उपस्थिती आणि आसाम सरकारच्या व्यस्त कामकाजात तुम्हाला शाही आदरातिथ्य देणे हे अत्यंत अन्यायकारक आणि अस्वीकारार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे.