अहमदाबाद - कथित अश्लील सीडी प्रकरणामुळे वादात अडकलेला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरमरीत टीका केली आहे. आयुष्यात ज्यांना आपल्या पत्नीला साथ देता आली नाही ते दुसऱ्यांच्या सीडी काढताहेत, अशी टीका हार्दिक पटेलने ट्विटरवरून केली आहे. अश्लील सीडी प्रकरणानंतर गुरुवारी रात्री एक ट्विट करून मोदींसह भाजपावर विविध मुद्यांवरून निशाणा साधला आहे. हार्दिक पटेलने ट्विटरवर एक कविता शेअर केली आहे. त्या कवितेमध्ये संघाची स्वातंत्र्य लढ्यातील अलिप्तता, गांधींची हत्या, हिंदू-मुस्लिम दंगली आणि मोदी आणि त्यांच्या पत्नीमधील संबंध यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसांचाच अवधी राहिला असताना हार्दिक पटेलचे कथित सेक्स व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. त्या माध्यमातून हार्दिक पटेलचे चारित्र्य हनन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या आठवड्यात हार्दिक पटेलच्या सुमारे पाच ते सहा सीडी व्हायरल करण्यात आल्या आहेत.क्लीपपैकी एका क्लीपमध्ये हार्दिक पटेल हा मुंडन आंदोलनामध्ये मुंडन केल्यानंतर मौजमजा करताना दिसत आहे. पाटीदार आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहून गुजरात सरकारचा निषेध करण्यासाठी हार्दिक पटेलसह पाटीदार नेत्यांनी मुंडन केले होते. या सीडींनंतर हार्दिकने विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत. दरम्यान हार्दिक पटेलने 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? असा सवालही केला होता. 'सत्तेत बसलेले लोक दावा करत आहेत की हा माझा व्हिडीओ आहे. पण माझं म्हणणं आहे की हा बनावट आहे. हा व्हिडीओ माझ्यासारख्या दिसणा-या एखाद्या व्यक्तीचा आहे. हा व्हिडीओ मी परदेशात राहणा-या माझ्या काही ओळखीच्या लोकांना फॉरेन्सिक चाचणी कऱण्यासाठी पाठवला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बनावट आहे', असे हार्दिक पटेलने सांगितले होते. 'आणि काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? अटलबिहारी वाजपेयी एकदा बोलले होते की, मी विवाहित नाहीये, पण संन्याशीही नाही. एका भाजपा आमदाराने चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला, पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. ही लढाई भाजपा विरुद्ध काँग्रेस नाही, तर भाजपा विरुद्ध हार्दिक आहे', असं हार्दिक पटेलने म्हटले होते.