बहुतांश स्टार्टअप कंपन्यांत दहापेक्षाही कमी कर्मचारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 01:14 AM2020-01-02T01:14:34+5:302020-01-02T06:54:44+5:30
आरबीआयच्या सर्वेक्षणाचा अहवाल; तीन टक्क्यांकडेच १00हून अधिक मनुष्यबळ
मुंबई : स्टार्टअप कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. पण केवळ १४ टक्के स्टार्टअप कंपन्यांनीच पहिल्या सहा महिन्यांत १0 पेक्षा अधिक कर्मचारी ठेवल्याचे आढळले आहे. व्यवसाय परिपक्व झाल्यानंतरही सुमारे ६0 टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १0 पेक्षा कमीच कर्मचारी काम करत आहेत.
रिझर्व्ह बँकेने स्टार्टअप क्षेत्राबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. यात देशातील १,२४६ कंपन्यांचा अभ्यास केला आहे. या अहवालात म्हटले आहे की, केवळ ३ टक्के स्टार्टअप कंपन्यांकडे १00 पेक्षा जास्त कर्मचारी कामावर आहेत.
६३ टक्के कंपन्यांनी आगामी दोन ते तीन वर्षांत २0 नवे कर्मचारी भरण्याचा इरादा बोलून दाखविला. बहुतांश स्टार्टअप कंपन्या सॉफ्टवेअर विकास, आयटी सल्ला/समाधान तसेच आरोग्य सेवा क्षेत्रातील असून, त्या तीन वर्षांमध्ये सुरू झालेल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २0१८ आणि एप्रिल २0१९ या कालावधीत हे सर्वेक्षण केले. त्यातून महत्त्वाचे वैशिष्ट्य असे समोर आले की, ७५ टक्के कंपन्या कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली आणि तामिळनाडू या पाच राज्यांतच केंद्रित आहेत.
सहा क्षेत्रांमध्ये अधिक कंपन्या
स्टार्टअप स्थापन करणाऱ्यांपैकी एकतृतीयांश लोक अभियांत्रिकी शाखेचे आहेत. बहुतांश संस्थापकांना व्यावसायिक अनुभव आहे. ७.३ टक्के संस्थापक विद्यार्थी आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्टार्टअप कंपन्यांपैकी सुमारे ५0 टक्के कंपन्या कृषी, डाटा व विश्लेषण, शिक्षण, आरोग्य, आयटी सल्ला/समाधान आणि वस्तू उत्पादन या सहा क्षेत्रांतील आहेत. बहुतांश स्टार्टअपमध्ये दोन संस्थापक आहेत.