३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या ‘मिराज’ने शिकविला धडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:13 AM2019-02-27T05:13:04+5:302019-02-27T05:13:16+5:30
भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी ...
भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी यांचे सरकार असताना ४९ मिराज लढाऊ विमाने खरेदीसाठी करार केला होता. त्या वेळी पाकिस्तान अमेरिकेकडून एफ-१६ विमाने खरेदी करणार होता आणि त्याला उत्तर देण्यासाठीच राजीव गांधी यांनी हा करार केला होता. द सॉल्ट या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. मिराज 2000 लढाऊ विमाने औपचारिकपणे २९ जून, १९८५ मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करून त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले.
पाकिस्तानात हवाई हल्ल्यासाठी मिराज-२000 विमानांचा वापर करण्यात आला होता. राफेल विमाने बनविणाऱ्या द सॉल्ट कंपनीनेच मिराज विमानांची निर्मिती केली आहे. ही विमाने १९८0च्या दशकात भारतीय हवाई दलात दाखल करून घेण्यात आली होती.
हल्ला करण्यासाठी जीबीयू-१२ हा अमेरिकन बनावटीचा लेझर गाइडेड बॉम्बचा वापर करण्यात आला. अचूक व नेमका हल्ला हे या बॉम्बचे वैशिष्ट्य आहे.
हल्ला करीत असताना पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाल्यास, त्याचा सामना करण्यासाठी मिराज विमानांमध्ये मॅट्रा मॅजिक क्लोस कॉम्बॅट मिसाइल बसविण्यात आले होते. मॅट्रा ही कंपनीही फ्रान्समधील असून, हवेतून हवेत (एअर टू एअर) हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात येतो.
अशा प्रकारच्या हल्ल्यात लक्ष्याचा अचूक माग घेणे गरजेचे असते. जे आपले लक्ष्य आहे, त्यावर बॉम्बहल्ला करण्यासाठी लेझर पॉडचा वापर करण्यात आला. जगातील काही देशांतील हवाई दलांकडेच हे अत्याधुनिक पॉड असून, भारतीय हवाई दल त्यापैकी एक आहे.
नियंत्रण रेषा ओलांडून १२ मिराज विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली, तेव्हा भारतीय बनावटीच्या ‘नेत्र’ या एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सीस्टिम असलेल्या ड्रोन विमानांद्वारे त्यांच्याशी संपर्क व समन्वय ठेवण्यात आला होता. ‘नेत्र’ हे विमान अत्याधुनिक रडारने सुसज्ज असून, हवाई हल्ले करताना टार्गेट शोधण्यासाठीही त्याचा वापर केला जातो.