ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवादराष्ट्ररक्षकांसाठी रविवारी संध्याकाळी पाच वाजता पाच मिनिटं घंटानाद करू- मोदीयेत्या रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन
नवी दिल्ली: कोरोना विषाणूचं जगभरातलं वाढतं थैमान, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोना विरोधात लढण्यासाठी देशवासीयांनी येत्या रविवारी जनता कर्फ्यू पाळावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. सकाळी ७ ते रात्री ९ वाजता सर्वांनी घरीच थांबावं आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा, असं नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या दोन महिन्यांपासून काही व्यक्ती अविरत काम करत आहेत. सर्वसामान्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी या व्यक्ती अखंडपणे कार्यरत आहेत. त्यांचं आभार येत्या रविवारी मानूया, अशी भावनिक साद मोदींनी घातली. मागील दोन महिन्यांपासून काही माणसं दिवसरात्र काम करताहेत. सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टर, रेल्वे, बस सेवांमधील कर्मचारी, माध्यमकर्मी यांचं काम सुरूच आहे. दुसऱ्यांसाठी त्यांचं काम सुरू आहे. त्यांना कोरोनाची बाधा होण्याचा धोका असूनही ते आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. ही मंडळी राष्ट्ररक्षक आहेत. देश त्यांचा आभारी आहे. आपण येत्या रविवारी त्यांना धन्यवाद देऊ.. संध्याकाळी पाच वाजता दरवाजा, खिडकी, गॅलरीत ५ मिनिटं उभे राहून त्यांचे आभार मानू. टाळ्या, थाळ्या, घंटा त्यांना अभिवादन करू. त्यांना सलाम करू, अशी भावनिक साद त्यांनी घातली. येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू' करण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजता जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असं मोदींनी म्हटलं. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत, याची तपासणी 'जनता कर्फ्यू'च्या माध्यमातून करूया, अशी साद त्यांनी घातली. युद्धाच्या परिस्थितीत ब्लॅकआऊट केलं जायचं. शत्रू राष्ट्रांना शहरं, गावं दिसू नये म्हणून घरातल्या लाईट्स बंद केल्या जायच्या. काचांना काळे पडदे लावले जायचे. युद्ध संपल्यानंतरही काही महापालिकांनी ब्लॅकआऊटचं मॉकड्रिल सुरू ठेवलं, याचा संदर्भ देत मोदींनी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' पाळण्यात यावा, अशी साद घातली. २२ मार्चला नागरिकांनी घराबाहेर पडू नये. देशाच्या हितासाठी लोकांनी घरी राहावं. राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचं नेतृत्व करावं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.