बंगळुरू - देशात ४० दिवसांच्या लॉकडाऊन काळात मद्यविक्री बंद होती. मात्र, त्यानंतर सरकारने मद्यविक्रीचा निर्णय घेतल्याने मद्यपींनी सोमवारी सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा लावल्या. मात्र आदेश न आल्याने गोंधळ होता. अनेक ठिकाणी दुपारी उशिरापर्यंत दुकाने सुरू न झाल्याने मद्यपींमध्ये नाराजीचे वातावरण होते. तर अनेक जिल्ह्यातील दुकानांबाहेर दोन-दोन किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरु या महानगरातीही मद्यपींनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या संधीचा फायदा घेत अनेकांनी मोठ्या प्रमाणात दारु खरेदी केली. यासंदर्भातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने व बार बंद झाले होते. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्य विक्री करणारे वाईन शॉप, बियर शॉप व देशी मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. त्यात सील बंद बाटलीतूनच मद्य विक्री करावी. दुकानावर पिण्यास मनाई, सोशल डिस्टन्सिंगंचे पालन, बॅरिकेटींग, सॅनिटायझरची फवारणी व ग्राहकांसाठी सॅनिटायझर अशा अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. मात्र, ४० दिवसांपासून दारुचा एक थेंबही न मिळाल्याने मद्यपींनी दारु दुकानाबाहेर गर्दी केली होती. या संधीचा फायदा घेत दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केली, तर काही ग्राहकांनी शक्य तेवढी जास्त दारु विकत घेण्याचा प्रयत्न केला.
मोठ्या प्रमाणात दारु विकत घेणाऱ्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर, दारु दुकानाची काही बिल्सचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कर्नाटकमध्ये दारु खरेदीचे असे तीन प्रकार समोर आले आहेत. दक्षिण बंगळुरु येथील एका दारु दुकानातील बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ५२,८४१ रुपयांची दारु एका ग्राहकाने खरेदी केल्याचे हे बिल आहे. त्यामध्ये १७ प्रकारची दारु खरेदी करण्यात आली होती.
नियमानुसार एका व्यक्तीस २.३ लीटर देशी दारु खरेदी करण्यास परवानगी आहे. तर, १८.२ लिटरपेक्षा जास्त बिअर खरेदी करता येत नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बिलानुसार एका व्यक्तीने १२८ लिटर दारु खरेदी केली आहे. तर सोशल मीडियावर आणखी एक बिल व्हायरल झाले असून तब्बल ९५ हजार रुपयांची दारु एकाच व्यक्तीने खरेदी केली आहे. त्यामुळे, संबंधित दुकानदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर या दुकानांची चौकशी सुरु करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, सध्या दारु दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी पाहता दारुवर टॅक्स वाढविण्याचा विचार कर्नाटक सरकार करत आहे. गेल्या ४० दिवसात राज्य सरकारने दररोज ६५ कोटी रुपयाचे नुकसान सहन केल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितले.