कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारात भाजपा-काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:47 AM2018-05-05T04:47:58+5:302018-05-05T04:47:58+5:30
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ आठ दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार रंगात आला असून काँग्रेस व भाजपने एकमेकांवरील हल्ले तीक्ष्ण केले आहेत. दिवसेंदिवस दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी होत आहे, व्यक्तिगत आरोपांच्या फैरी झडत आहेत.
राज्यात काँग्रेस सरकार टिकवण्यासाठी लढत आहे तर भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ सभा घेण्याचे ठरवून सरकार आणि पक्षाची सगळी शक्ती या निवडणुकीसाठी पणाला लावली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने साम, दाम, दंड, भेदाचा मार्ग अवलंबून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लक्ष्य करून हल्ले सुरू केले आहेत.
निवडणूक प्रचारात मोदी बंगळुरुला गार्बेज सिटी म्हणत असून त्याचा दोष राज्य सरकारला देत आहेत, सिद्धरामय्या यांनी बंगळुरूला गार्बेज सिटी बनवली, असा आरोप ते करीत आहेत. मोदी यांनी जनरल थिमय्या आणि जनरल करीअप्पा यांचे नाव घेऊन काँग्रेसवर हल्ला केला की, काँग्रेसने या दोघांचा अपमान केला होता. राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्यास मोदी विसरले नाहीत. अर्थात गांधीही मागे न राहता म्हणाले की, गार्डन सिटीला गार्बेज सिटी संबोधून मोदी यांनी बंगळुरूत राहणाऱ्यांचा अपमान केला आहे. बंगळुरू हा भारताचा गौरव असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
भाजपा नेत्यांकडून होत असलेले वैयक्तिक आरोप आणि वापरली जाणारी भाषा यावरून काँग्रेसने मोदी यांच्यावर चौफेर हल्ला चढविला आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपच्या प्रचाराबद्दल तक्रारही नोंदविली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी आरोप केला की, मोदी काँग्रेसवर हल्ला करण्याऐवजी या राज्याचा आणि तेथील जनतेचा अपमान करीत आहेत. पंतप्रधान मोदी खोटारडे आहेत. राज्याचा विकास त्यांना दिसत नाही; त्यांना गुन्हेगारी आणि दुराचारच दिसतो.
आयटी हब त्यांना दिसत नाही. जनरल थिम्मया आणि करिअप्पा यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून पंतप्रधानांचा इतिहास किती दुबळा आहे, हे दिसून येते. भाजप आणि मोदी राज्यांत मतविभाजन करून सांप्रदायिकता निर्माण करू पाहत आहेत.