मोदी सरकारचा विस्तार, नव्या मंत्र्यांच्या शपथविधीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 10:25 AM2017-09-03T10:25:51+5:302017-09-03T12:13:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे.
नवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शपथविधीच्या सुरुवातीला धर्मेंद्र प्रधान, पियूष गोयल, निर्मला सीतारमन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवप्रताप शुक्ल, अश्निनीकुमार चौबे, डॉ. वीरेंद्र कुमार, अनंत कुमार हेगडे, राजकुमार सिंह, हरदीपसिग पुरी, गजेंद्रसिंह शेखावत, सत्यपाल सिंह, अल्फोन्स कन्ननथनम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. .
मोदींच्या मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या 9 नव्या चेहऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये भाजपाचे खासदार अश्विनीकुमार चौबे (बिहार), वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेश) शिवप्रताप शुक्ल (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. त्याबरोबरच गजेंद्रसिह शेखावत, मुंबईचे माजी पोलीस प्रमुख सत्यपाल सिंह आणि कन्ननथनम अल्फोन्स हेसुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तसेच अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंह आणि माजी आयएफएस अधिकारी हरदीप पुरी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला असून, शिवसेना मंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधील मतभेत पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.