'...तर त्या शेकडो शेतकऱ्यांचा जीव वाचला असता'; अरविंद केजरीवालांची केंद्रावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:29 PM2021-11-19T12:29:14+5:302021-11-19T12:29:41+5:30
'देशातील अन्नदाता शेतकऱ्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या'- राहुल गांधी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी आज तीन कृषी कायदे(Three Agricultural Laws) मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. 'केंद्र सरकारने हा निर्णय आधी घेतला असता तर त्या सेकडो शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असते', असे केजरीवाल म्हणाले.
सीएम केजरीवाल यांचा केंद्र सरकारला सवाल
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज गुरुपर्व निमित्त एक मोठी बातमी मिळाली आहे. शेतकऱ्यांचे जे आंदोलन वर्षभर सुरू होते, त्यात 700 शेतकरी शहीद झाले. आज शेतकऱ्यांना मोठे यश मिळाले आहे. मी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. शेतकऱ्यांच्या लढ्याचे फळ मिळाले. पण, केंद्र सरकारने हाच निर्णय आधी घेतला असता तर अनेक शेतकऱ्यांचे प्राण वाचू शकले असते. 700 शेतकरी शहीद होण्यापासून वाचू शकले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांनी गर्विष्ठांची मान झुकवली- राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर करुन आपली भावना व्यक्त केली. देशातील अन्नदाता शेतकऱ्याने आपल्या आंदोलनातून गर्विष्ठांच्या माना झुकवल्या. अन्यायविरुद्धच्या या विजयाबद्दल शुभेच्छा... असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच, राहुल यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यामध्ये, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मला अभिमान वाटतो, मी या आंदोलनास पूर्णपणे समर्थन देत आहे. मी शेतकऱ्यांसोबत असून पंजाबमध्ये जाऊन हा मुद्दा उपस्थित करणार आहे. तर, सरकारला हे तीन कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू, असे राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते.
नरेंद्र मोदी काय म्हणाले ?
शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आम्ही तीन कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. कदाचित आमच्या प्रयत्नांमध्ये काही उणीव, त्रुटी राहिली असेल. त्यामुळे तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं मोदींनी जाहीर केलं.