लखनऊ - उत्तर प्रदेशमधील सितापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्ज न फेडणा-या शेतक-याला लोन रिकव्हरी एजंट्सनी त्याच्याच ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्ज न फेडल्याबद्दल वसुली करण्यासाठी आले असताना एजंट्सनी शेतक-याला ट्रॅक्टरखाली चिरडलं. मृत पावलेल्या शेतक-याची ओळख ज्ञानचंद्र अशी पटली आहे. ज्ञानचंद्र यांचा जागीच मृत्यी झाला. ज्ञानचंद्र यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 90 हजारांचं कर्ज घेतलं होतं.
ज्ञानचंद्र यांच्याकडून वसुली करण्यासाठी लोन रिकव्हरी एजंट्स त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी ज्ञानचंद्र पैसे देण्यास असमर्थ असल्या कारणाने त्याचा ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ज्ञानचंद्र यांच्या भावाने केलेल्या दाव्यानुसार, आपण 35 हजार रुपये डिपॉझिट केल्याचं सांगत विनवणी केली जात असतानाही एजंट्सनी लक्ष दिलं नाही आणि ट्रॅक्टरची चावी खेचून घेतली. एजंट्सनी ट्रॅक्टर सुरु करुन नेण्याचा प्रयत्न केला असताना ज्ञानचंद्र यांनी समोर उभं राहून अडवण्याचा प्रयत्न केला. पण एजंट्सनी अंगावर ट्रॅक्टर घालून ज्ञानचंद्र यांना चिरडलं ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानचंद्र यांनी 2015 रोजी कर्ज घेतलं होतं, ज्यामधील काही रक्कम त्यांनी परत केली होती. जानेवारीच्या सुरुवातीलाच आपल्या पतीने 35 हजार रुपये भरले असतानाही कंपनीने नोटीस जारी केली होती असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एजंट्सनी आधी ज्ञानचंद्र यांना ट्रॅक्टरवर बसवलं आणि नंतर खाली ढकलून ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घातला. घटनेनंतर एजंट्सनी ट्रॅक्टरसहित घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास सुरु आहे. ज्ञानचंद्र यांच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थ घटनास्थळी जागे झाले होते. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गावक-यांनी धरणे आंदोलन करत पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पोलिसांकडे सोपवण्यास नकार दिला होता. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने प्रकरणाची योग्य चौकशी करण्याचं आश्वासन दिल्यानंतर गावक-यांनी आंदोलन मागं घेतलं. पाचही एजंट्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप अटक करण्यात आलेली नाही.