Lockdown 4.0 केंद्राचा लॉकडाउन ३० जूनपर्यंत! मार्गदर्शिका प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:16 AM2020-05-31T06:16:37+5:302020-05-31T06:17:10+5:30
टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करणार । कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र ८ जूनपासून धार्मिक स्थळे, हॉटेल्स सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशव्यापी ‘लॉकडाऊन’चा चौथा टप्पा रविवारी ३१ मे रोजी संपल्यानंतर देशाभरातील फक्त कोरोनाबाधित ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये येत्या ३० जूनपर्यंत ‘लॉकडाऊन’ सुरू ठेवण्याचा आदेश केंद्र सरकारने शनिवारी जारी केला. ‘कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे दैनंदिन व्यवहार पुन्हा केव्हा व कसे टप्प्याटप्प्याने सुरू करावेत, तसेच ‘लॉकडाऊन’ नसले तरी कोरोना रोखण्यासाठी यापुढे कोणते निर्बंध सुरू राहतील, याची मार्गदर्शिकाही केंद्राने प्रसिद्ध केली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार केंद्रीय गृहसचिवांनी यासंबंधीचे पत्र सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना रवाना केले. ‘लॉकडाऊन’ फक्त ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये लागू राहणार असले तरी, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यांना, त्याबाहेरच्या काही क्षेत्रांनाही काही वेगळे निर्बंध लागू करायचे असतील, तर तसे त्यांना करता येईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले.
‘कंटेन्मेंट झोन’ वगळता इतर ठिकाणचे व्यवहार तीन टप्प्यांत खुले करण्यात येतील. यापैकी पहिल्या टप्प्यात ८ जूनपासून प्रार्थनास्थळे, हॉटेल, उपाहारगृहे व आदरातिथ्य व्यवसायाची अन्य आस्थापने आणि शॉपिंग मॉल पुन्हा खुले होतील. त्यासंबंधीची स्वतंत्र नियमावली नंतर जारी केली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात शाळा, कॉलेजे, कोचिंग क्लासेस व अन्य शैक्षणिक, तसेच प्रशिक्षण संस्था पुन्हा केव्हा सुरू करायच्या यासंबंधीचा निर्णय राज्य सरकारे सर्व संबंधितांशी चर्चा करून जुलै महिन्यात घेऊ शकतील. तिसºया टप्प्यात स्थानिक परिस्थितीचा आढावा(पान १ वरून) घेऊन आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो रेल्वेची वाहतूक, सिनेमा व नाट्यगृहे, व्यायामशाळा, मनोरंजन उद्याने, तरणतलाव, सार्वजनिक कार्यक्रमांची सभागृहे, तसेच मोठी गर्दी जमणारे धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्यक्रम पुन्हा केव्हा सुरू करायचे, याचा निर्णय घेतला जाईल. यासाठी कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही; परंतु हा तिसरा टप्पा जुलैमधील दुसºया टप्प्यानंतरचा असल्याने यात उल्लेख केलेल्या गोष्टी त्यानंतर म्हणजे आॅगस्टपासून पुढेच सुरू केल्या जाऊ शकतील.
आरोग्य सेतूचा वापर
आरोग्य सेतू अॅपमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये संसर्ग होण्याची शक्यता असल्यास पूर्वसूचना मिळण्यास मदत होते. त्यामुळे हे अॅप ती व्यक्ती व समाजासाठी ढाल म्हणून काम करते. कार्यालये व कामाच्या ठिकाणी सर्वांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा प्रशासनाने लोकांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला द्यावा. जेणेकरून योग्य वेळेवर वैद्यकीय सावधगिरी बाळगता येईल.