तेलंगणामध्ये लॉकडाऊन २५ मेपर्यंत?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:50 AM2020-04-28T03:50:03+5:302020-04-28T03:50:19+5:30
तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांनी राज्यातील साथीच्या स्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीत नुकताच आढावा घेतला.
हैदराबाद : कोरोना विषाणूच्या साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनला ३ मेनंतर पुन्हा मुदतवाढ द्यावी की न द्यावी याबद्दल केंद्र सरकार खल करत असतानाच, तेलंगणा सरकारने मात्र राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी २५ मेपर्यंत वाढविण्याचा विचार चालविला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षाचे प्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के . चंद्रशेखर राव यांनी राज्यातील साथीच्या स्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीत नुकताच आढावा घेतला. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे लॉकडाऊनच्या काळात तेलंगणामध्ये काटेकोर पालन होत आहे की नाही, याचीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. लॉकडाऊनमुळे तेलंगणासह सर्वच राज्यांतील उद्योगधंदे सध्या बंद आहे. त्यामुळे अनेक कामगारांचा रोजगार बुडाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा व योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी राव यांनी केली.