नवी दिल्लीः लोकसभानिवडणूक कधी होणार?, या देशवासीयांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर आज मिळालं आहे. लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असून मतदान 11 एप्रिल ते 19 मे या काळात सात टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 23 मे रोजी निकाल जाहीर होईल. 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याआधी देशात नवं सरकार स्थापन होईल.
17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांत 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्याला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचा पहिला टप्पाही 11 एप्रिलपासूनच सुरू होईल. तर, 19 मे रोजी निवडणुकांच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यामुळे 39 दिवसांत निवडणुक आटोपली जाणार आहे. त्यानंतर, 4 दिवसांनी मतदानाचा निकाल जाहीर होईल.
पहिला टप्पा - 11 एप्रिल - 20 राज्यांतील 91 मतदारसंघ
दुसरा टप्पा - 18 एप्रिल - 13 राज्यांतील 97 मतदारसंघ
तिसरा टप्पा - 23 एप्रिल - 14 राज्यांतील 115 मतदारसंघ
चौथा टप्पा - 29 एप्रिल - नऊ राज्यांतील 71 मतदारसंघ
पाचवा टप्पा - 6 मे - सात राज्यांतील 51 मतदारसंघ
सहावा टप्पा - 12 मे - सात राज्यांतील 59 मतदारसंघ
सातवा टप्पा - 19 मे - आठ राज्यांतील 59 मतदारसंघ
निकाल - 23 मे
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून उत्कंठा लागलेली घटिका समिप आली असून निवडणुकांचा बिगुल वाजला. देशातील 543 लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केली. त्यामुळे, दिल्लीत असणारे नेते आता गल्लीकडे वळणार आहेत. तर, आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान खासदार आणि उच्छुक उमेदवारांची कसरत पाहायला मिळणार आहे.