नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीने आपल्या लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. शनिवारी मध्यरात्री भाजपाने एक यादी जाहीर केली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा उमेदवाराची घोषणा केली होती. त्यानंतर, आज आणखी एक यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा उल्लेख नाही.
भाजपाने 48 लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, झारखंड आणि गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गोव्यातून 2 उमेदवार, मध्य प्रदेशमधून 15, झारखंडमधून 10, गुजरातमधून 15, हिमाचल प्रदेशमधून 4 आणि कर्नाटकमधून 2 अशी एकूण 48 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यासोबतच, विधानसभा पोटनिवडणुकीतील 6 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये गोवा आणि गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रत्येकी 3-3 उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली.
दरम्यान, भाजपाने महाराष्ट्रात पहिली 16 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर, शनिवारी मध्यरात्री 6 उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे युतीच्या फॉर्म्युल्यानुसार अद्याप 3 जागांवर भाजपाकडून उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. त्यामध्ये माढा, पालघर आणि मुंबई उत्तर येथील जागांचा समावेश असल्याचे दिसून येते.