केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं निवडणुकीआधीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अपेक्षेप्रमाणे डझनभर निर्णय घेऊन लोकसभेसाठी मतपेरणी केली आहे. त्यात त्यांनी देशाच्या आर्थिक राजधानीला मोठी भेट दिलीय. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेसाठी ५४ हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे. मुंबई रेल्वेचा चेहरामोहराच बदलून, 'व्हेंटिलेटर'वरील जीवनवाहिनीला नवजीवन देण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. परंतु, मुंबई लोकलचा 'ट्रॅक' वापरून लोकसभेत जाण्याचाच हा प्रयत्न दिसतोय.
मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी) फेज ३ ए अंतर्गत येणाऱ्या रेल्वे मार्गांचा विस्तार आणि आधुनिकीकरण या कामांसाठी रेल्वे मंत्रालयानं ५४,७७७ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हा खर्चात राज्य सरकारचाही वाटा असेल.
एमयूटीपी ३ ए अंतर्गत प्रस्तावित कामं...
>> सीएसएमटी - पनवेल मार्गावर फास्ट एलिव्हेटेड कॉरिडोर>> पनवेल - विरार नवी उपनगरीय सेवा>> गोरेगाव ते बोरिवली दरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार>> बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन>> कल्याण-आसनगावदरम्यान चौथी लाईन>> कल्याण यार्ड>> रेल्वे स्टेशनांचं नूतनीकरण>> मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल >> तांत्रिक सक्षमीकरण