Lok Sabha Election 2019 : लोकसभेचे बिगुल वाजले... निवडणूक आयोगाकडून मतदानाची तारीख जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 05:24 PM2019-03-10T17:24:35+5:302019-03-10T17:44:49+5:30
17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल.
नवी दिल्ली - देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले.
17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. गेल्या 8 दिवसांपासून उत्कंठा लागलेली घटिका समिप आली असून निवडणुकांचा बिगुल वाजला. देशातील 543 लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी केली. त्यामुळे, दिल्लीत असणारे नेते आता गल्लीकडे वळणार आहेत. तर, आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी विद्यमान खासदार आणि उच्छुक उमेदवारांची कसरत पाहायला मिळणार आहे.
#WATCH live from Delhi: Election Commission of India addresses a press conference. https://t.co/E0yEp9LHYq
— ANI (@ANI) March 10, 2019
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या सर्वच मंत्र्यांना विकासकामांची उद्धाटने 8 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे बजावले होते. त्यामुळे 9 मार्चला निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा अंदाज खोटा ठरला असून आयोगाने आज सकाळी पत्रकार परिषदेची घोषणा केली. त्यानंतर नियोजित वेळेप्रमाणे आयोजित पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा करण्यात आली. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.