रमजान महिन्यात लोकसभा निवडणुका नको, मुस्लिम धर्मगुरुंनी घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:49 PM2019-03-11T12:49:40+5:302019-03-11T12:51:13+5:30
सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या आहेत. सात टप्प्यांमध्ये या निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटलंय. मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे.
6 मे पासून अल्पसंख्याक समुदायाचा रमजानचा महिना सुरु होणार आहे. मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे. मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्याची मुस्लिम समाज वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. मुस्लिम समाजासाठी हा महिना पवित्र मानला जातो. यावेळी मुस्लिम रमजानचा रोजा ठेवतो, नमाज पठण करतो या काळात निवडणुकीत मतदान करणे शक्य होणार नाही असं मते मुफ्ती असद कसमी यांनी मांडले.
मुस्लिम धर्मगुरु खालिद रशीद फरंगी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेत घेतला आहे. खालिद रशीद फरंगी यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान रमजाननंतर घेण्यात यावे अशी मागणीही केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने पुर्नविचार करावा अशी मागणी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीचे देशभरात सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले होते. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच केंद्र सरकारने विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन अशा कार्यक्रमाचा धडाका लावला होता. भाजपच्या नेत्यांकडूनही पदाधिकारी आणि राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना 8 मार्च आधीच लोकहिताचे निर्णय, उद्घाटने उरकून घ्यावीत अशा सूचना केल्या होत्या. यानंतर रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यात या निवडणुका पार पडणार असून 23 मे रोजी देशात कोणाची सत्ता येणार हे चित्र स्पष्ट होईल. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर मुस्लिम समाजाकडून आक्षेप घेतल्याने केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.