पुलवामासंदर्भातील वक्तव्य पित्रोदांचे वैयक्तीक मत : काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:18 PM2019-03-22T18:18:05+5:302019-03-22T18:20:33+5:30
भाजप आणि मोदीजींनी एखाद्याच्या वैयक्तीक मतावरून तिरस्कार पसरविणे बंद करावे, असं ट्विट रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केले आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसनेते सॅम पित्रोदा यांच्या पुलवामा घटनेसंदर्भातील वकव्यापासून काँग्रेसने स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच सॅम यांचे ते वैयक्तीक मत असून त्याचा काँग्रेसची संबंध नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी म्हटले आहे. पुलवामा घटनेसाठी संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरता येणार असे म्हणत पित्रोदा यांनी सैन्याच्या बालाकोट येथील एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
सॅम पित्रोदाच्या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक पावित्रा घेत काँग्रेसवर टीका केली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शाह, अरुण जेटली यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आंतकवादाला योग्य ठरविणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. अशा पद्धतीचे वक्तव्य करून काँग्रेस नेते सैन्याचा अपमान करत. त्यावर काँग्रेसकडून प्रत्युत्तर आले आहे.
पुलवामा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान मोदी शुटींग करण्यात व्यस्त होते. भाजप आणि मोदीजींनी एखाद्याच्या वैयक्तीक मतावरून तिरस्कार पसरविणे बंद करावे, असं ट्विट सुरजेवाला यांनी केले आहे. तसेच पुलवाला हल्ला मोदी सरकारचे मोठे अपयश होते. तर बालाकोट एअर स्ट्राईक वायूसेनेच्या सामर्थ्याचे प्रतीक होते. पाकिस्तानातील अतिरेकी संघटना आणि जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा आपल्या वाईट हेतूंमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत, असंही सुरजेवाला यांनी म्हटले.