Lok Sabha Election 2019: ...म्हणून 'ही' दीड कोटी मतं ठरणार खास!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 05:14 PM2019-03-10T17:14:17+5:302019-03-10T17:16:35+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत नव्याने नोंद झालेल्या मतदारांची संख्या 1.9 कोटी असून त्यामध्ये मतदानाच्या तारखेपर्यंत वाढ होऊ शकते
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार देशातील लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील, असे निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी जाहीर केले.
आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली असून आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत नव्याने नोंद झालेल्या मतदारांची संख्या 1.9 कोटी असून त्यामध्ये मतदानाच्या तारखेपर्यंत वाढ होऊ शकते. त्यासाठी, अद्यापही आयोगाकडून मतदार नोंदणीप्रकिया सुरू आहे. गत 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 81.5 कोटी मतदारांची नोंदणी झाली होती. मात्र, मतदानापर्यंत हा आकडा वाढला होता.
1 जानेवारी 2019 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची आकडेवारी 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार 89.7 कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये 46.5 कोटी पुरुष तर 43.2 कोटी स्त्री मतदार आहेत. तसेच 33,109 मतदारांनी स्वत:ला तिसऱ्या प्रवर्गात टाकले आहे. तर, 16.6 लाख मतदार हे नोकरदार असून ते पोस्टल मतदान असणार आहे.
सन 2014 च्या निवडणुकांवेळी 83 कोटी मतदारांची नोंदणी होती. त्यामध्ये 44 कोटी पुरुष आणि 40 कोटी महिलांचा समावेश होता. तिसऱ्या प्रवर्गात 28,527 मतदार सहभागी होते. तर, 13.6 लाख नोकरदार जे पोस्टल मतदार होते. दरम्यान, 2014 आणि 2019 च्या निवडणुकांतील नवमतदारांची तुलना केल्यास गत 2014 मध्ये नवमतदारांची संख्या जास्त होती. 2014 मध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या 2.3 कोटी होती, जी यंदा 1.6 कोटी असणार आहे. त्यामुळे या तरुण मतदारांचा कौल आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही महत्त्वाचा ठरणार आहे.