सासरा-जावयातच जुंपली; तेजप्रताप यादव यांचे पक्षविरोधी धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 12:43 PM2019-05-04T12:43:24+5:302019-05-04T12:44:04+5:30
तेजप्रताप यादव यांच्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, राजदच्या परंपरागत मतदार संघातून बाहेरच्या व्यक्तींना निवडून देऊ नका.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील चार टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. मात्र देशातील अनेक भागातील लोकसभेची रणधुमाळी आता रंगात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडत असताना आता, बिहारमध्ये जावई आणि सासऱ्यातच जुंपल्याचे चित्र आहे. लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी आपले सासरे आणि राजदचे सारणचे उमेदवार चंद्रिका राय यांना मतदान करू नका, असं आवाहन केले आहे.
दुसरीकडे चंद्रीका यादव यांच्या प्रचारासाठी लालू प्रसाद यादव यांचे दुसरे चिरंजव तेजस्वी यादव तीन दिवसांपासून सारणमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मात्र तेजप्रताप यादव यांच्या भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. तेजप्रताप यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की, राजदच्या परंपरागत मतदार संघातून बाहेरच्या व्यक्तींना निवडून देऊ नका. येथील महान जनता बाहेरच्या व्यक्तीला कधीही मतदान करणार नाही. सारणच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे. राजदच्या उमेदवाराला मत देऊ नये. येथील उमेदवार चंद्रीका राय हे रंगबदलू असून लालू प्रसाद यादव यांच्या मतदार संघातून या व्यक्तीला निवडून देऊ नका, असंही तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे.
सासरे चंद्रीका राय येथील जनतेला फसविण्याचे काम करत आहेत. हा व्यक्ती सरड्यासारखे रंग बदलतो. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, की या व्यक्तीला आपले मौल्यवान मत देऊ नये, असंही तेजप्रताप यादव यांनी म्हटले आहे.
दरम्यान मुलगी ऐश्वर्या आणि तेजप्रताप यांच्यातील मतभेदामुळे निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचे याआधी चंद्रीया राय यांनी म्हटले होते. तसेच ऐश्वर्या-तेजप्रताप यांच्यातील संबंध सुधारतील, असंही चंद्रीका राय यांनी सांगितले होते. मात्र तेजप्रतापच्या या भूमिकेमुळे राय आणि यादव कुटुंबातील वाद आणखीनच चिघळत चालल्याचे चित्र आहे. सारणमधून चंद्रीका राय यांना उमेदवारी जाहीर झाली, त्यावेळी देखील तेजप्रताप यादव यांनी विरोध केला होता.