अमेठीतूनकाँग्रेसने अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आतापर्यंत सस्पेंस कायम आहे. मात्र, बुधवारी उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र उमेदवार जाहीर न केल्याने पक्षाचे नेते व कार्यकर्ते नाराज आहेत.
गौरीगंज येथील कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केलं. याच दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ब्लॉक अध्यक्ष अवनीश मिश्रा सेनानी यांनी अमेठीतील गौरीगंज येथील काँग्रेस भवन संकुलात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी वेळीच त्यांना वाचवलं.
या प्रकरणी अवनीश मिश्रा सेनानी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, "आम्ही पाच वर्षांपासून मेहनत घेत आहोत आणि गावोगावी फिरत आहोत. जवळपास सर्वच पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. आता जनता अमेठीतील उमेदवारीबाबत आम्हालाच विचारत आहे आणि आम्हाला जनतेला उत्तर द्यायचं आहे."
"उद्यापर्यंत राहुल गांधींनी अमेठीतून त्यांच्या नावाची घोषणा केली नाही, तर मी आत्महत्या करेन. गांधी कुटुंबासाठी कोणीतरी आत्महत्या केल्याची इतिहासात नोंद होईल. आपल्या लोकांची मनस्थिती बिघडली आहे. अशा स्थितीत मी आत्महत्या करेन. गांधी कुटुंबाला अमेठीतून निवडणूक लढवावी लागेल."
काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवण्याच्या विषयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींनी अमेठीतून निवडणूक लढवावी, अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्हाला विश्वास आहे की राहुल गांधी आमचे ऐकतील, तिथे येतील आणि मोठा विजय नोंदवतील.