नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे निकाल फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि अनेक पक्षनेत्यांना आरसा दाखविणारे आहेत, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ या साप्ताहिकाने म्हटले आहे. नेते आणि कार्यकर्ते आपल्या भ्रमात मश्गूल होते आणि पंतप्रधानांनी सामान्य जनतेच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले, असेही या साप्ताहिकाने म्हटले.
आरएसएस भाजपची बूथस्तरीय शक्ती नसेल. मात्र, पक्षाने निवडणुकीत स्वयंसेवकांशी साधा संपर्कही केला नाही. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे निकालांवरून दिसून येते, असे लेखात म्हटले आहे.
त्यांच्या लक्षातच आले नाही...‘२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हे फाजील आत्मविश्वास बाळगलेले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी आरसा दाखवणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० हून अधिक जागांचे केलेले आवाहन हे त्यांच्यासाठी (पक्ष कार्यकर्ते आणि नेते) लक्ष्य आणि विरोधकांसाठी आव्हान आहे, हे त्यांच्या लक्षातच आले नाही,’ असे आरएसएसचे आजीवन सदस्य असलेले रतन शारदा यांनी या लेखात नमूद केले आहे.
कठोर मेहनत करून ध्येय गाठले जाते- लोकसभा निवडणुकीत २४० जागांसह भाजप बहुमतापासून दूर राहिला. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) २९३ जागांसह बहुमत प्राप्त झाले आहे. काँग्रेसला ९९, तर ‘इंडिया’ आघाडीला २३४ जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर विजयी झालेल्या दोन अपक्ष उमेदवारांनीही काँग्रेसला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. nत्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांची संख्या २३६ झाली आहे. ‘सोशल मीडियावर पोस्टर आणि सेल्फी शेअर करून नाही, तर कार्यक्षेत्रात कठोर मेहनत करून ध्येय गाठले जाते’, असेही शारदा म्हणाले.