जयपूर - राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एक जागेसाठी तर पश्चिम बंगालमध्ये लोकसभा व विधानसभेच्या प्रत्येकी एक-एक जागेसाठी झालेल्या पोट-निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राजस्थानच्या अलवर, अजमेर लोकसभा आणि मंडलगडच्या विधानसभेच्या जागेसाठी तर पश्चिम बंगालमधील उलबेरिया लोकसभा व नवपाडा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. दरम्यान नवपाडा विधानसभेच्या जागेवर तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला आहे.
पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीच्या निकालामुळे ममता बॅनर्जी यांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे भाजपाला जोरदार धक्का मिळाला आहे. नवपाडा येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला 1 लाख 11 हजार 729 मतं मिळाली असून दुस-या क्रमांकावर असलेल्या भाजपाच्या संदीप बॅनर्जी यांना 35 हजार 980 मतं मिळाली आहेत. उलबेरिया लोकसभेच्या जागेवरही ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. येथे सुद्धा भाजपा दुस-या क्रमांकावर आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, उलबेरिया येथे टीएमसीचे सजदा अहमद यांना आतापर्यंत 40 हजार 829 मतं मिळाली आहेत, तर भाजपा उमेदवाराला 17 हजार 625 आणि सीपीआयएम उमेदवाराला 8 हजार 576 मतं मिळाली आहेत. 29 जानेवारीला नवपाडा आणि उलबेरिया या जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. उलबेरिया येथे 76 टक्के मतदान झाले होते तर नवपाडा येथे 75.5 टक्के मतदान झाले होते.