आप-काँग्रेस आघाडीची पुन्हा चर्चा ? काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:40 PM2019-03-18T13:40:07+5:302019-03-18T13:40:55+5:30
दिल्ली काँग्रेसमध्ये आपसोबत आघाडीवरुन दोन गट पडलेत, त्यामुळे आपसोबत आघाडी करावी की नाही या विवंचनेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पडलेले आहेत
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सगळेच पक्ष प्रचाराला लागले आहेत. मात्र दिल्ली प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या सर्व हालचाली थंड पडल्या आहेत. दिल्ली काँग्रेसमध्येआपसोबत आघाडीवरुन दोन गट पडलेत, त्यामुळे आपसोबत आघाडी करावी की नाही या विवंचनेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पडलेले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीत प्रचार करावा की नाही असा संभ्रम निर्माण झालाय.मात्र याच दरम्यान पुन्हा एकदा आप-काँग्रेस यांच्या आघाडीबाबत चर्चा सुरु झाली. कदाचित आज नाही तर उद्या याबाबतची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
आम आदमी पार्टीने रविवारी दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करुन दिल्लीत आप स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे संकेत दिलेत. मात्र काँग्रेसने लोकसभा निवडणुकीला घेऊन अद्याप कोणतीच हालचाल सुरु केली नाही. काँग्रेसने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांनी आपसोबत आघाडी होण्याला आधीच विरोध केला आहे तर दिल्ली काँग्रेसचे प्रभारी पीसी चाको यांनी आपसोबत कांग्रेसची आघाडी व्हावी असा मानसिकतेत आहे. आपबरोबर आघाडी करावी की नाही यासाठी जिल्हा अध्यक्षांकडून मते मागवण्यात येत आहेत. त्यामुळे दिल्लीतील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर प्रचार कधी सुरु करणार असा प्रश्न उभा राहिला आहे.
रविवारी दिल्ली काँग्रेस प्रभारी पीसी चाको यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये चाको यांनी आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्यावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली. मात्र राहुल गांधी यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही तरीही पुढील एक-दोन दिवसात आघाडीबाबत चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पक्षातील एका गटाला वाटत आहे.
मात्र काँग्रेसच्या या गदारोळात आम आदमी पक्षाने सातही लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी सहा महिन्यांपूर्वी 6 लोकसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले होते. मागील सहा महिन्यांपासून हे उमेदवार निवडणुकीच्या प्रचाराला लागलेत. आम आदमी पक्षाच्या निवडणूक समितीने निश्चित केल्यानंतर सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आम आदमी पार्टीने काँग्रेससोबत समझोता करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून काँग्रेसकडून मिळणारा प्रतिसाद थंड होता. काँग्रेस दिल्लीत एकटे लढून एकप्रकारे भाजपला मदत करतंय असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी केला.
आम आदमी पक्षाच्या सात उमेदवारांची यादी
चांदनी चौक -पंकज गुप्ता
पूर्व दिल्ली - आतिशी
उत्तर-पूर्व - दिलीप पांडे
नवी दिल्ली - बृजेश गोयल
दक्षिण दिल्ली - राघव चड्ढा
उत्तर-पश्चिम - गुगन सिंह
पश्चिम दिल्ली - बलबीर सिंह जाखडा