नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी सर्वच राजकीय पक्षातले नाराज नेते पक्ष बदलत आहे. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्तच आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या नाराज खासदाराने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
आम आदमी पक्षाचे नाराज खासदार हरिंदर सिंह खालसा यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. दिल्लीमध्ये सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे लोकसभेत 4 खासदार आहेत. हे चारही खासदार पंजाब राज्यातून निवडून आलेले आहेत.मात्र हरिंदर सिंह खालसा यांना याआधीच आम आदमी पक्षाने निलंबित केले आहे.
भाजपात प्रवेश केल्यानंतर हरिंदर सिंह खालसा म्हणाले की, सध्या भारतीय जनता पार्टी हा एकच पक्ष देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहे. बाकी सगळे पक्ष सत्तेसाठी लाचार आहेत. मी कोणत्याही अटींशिवाय भाजपात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचा माझ्यावर प्रभाव पडला आहे. हरिंदर सिंह खालसा यांचे कुटुंब सार्वजनिक जीवनात खूप पहिल्यापासून आहे. त्यांचे कुटुंब अकाली दलाशी जोडलेले होते. 1974 च्या बॅचमधील ते आयएफएस अधिकारी होते. 1984 मध्ये पंजाबमध्ये सिखविरोधी दंगल झाली होती त्याच्या निषेधार्थ हरिंदर यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता.
हरिंदर सिंह खालसा यांचे वडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जवळचे सहकारी होते. 1996 मध्ये पहिल्यांदा ते लोकसभेत निवडून आले. तर 2014 मध्ये फतेहगड लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीकडून हरिंदर सिंह यांनी निवडणूक लढवून जिंकून आले. राजकारणात येण्याआधी हरिंदर सिंह खालसा नार्वेमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं विधान केले होते.