नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान झाले असून सातव्या टप्प्याचे मतदान आणखी शिल्लक आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात आलेले दोन हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी सध्या सोशल मीडियावर असली तरी उत्तर प्रदेशातील काही स्थानिक वृत्तपत्रांनी ही बातमी प्राधान्यांने छापली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये टाकण्यात आले होते.
आता लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळजवळ संपले आहे. आता राज्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या खात्यावरून २ हजार रुपये परत घेण्यात आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मुजफ्फरपूरमधून अशा तक्रारी आल्या आहेत. आपल्या खात्यातून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये अनुदान काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
बँकेत पैसे काढण्यास गेल्यानंतर खात्यावर पैसेच नसल्याचे समोर आले आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी अनुदान योजनेचे पैसे परत घेण्यात आल्याचे समजले. या संदर्भात बँकेच्या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नसून त्यांच्या खात्यातील रक्कम कट करण्यात आली आहे. किसान एकता संघटनेने बँकांच्या कृतीचा विरोध केला असून सरकारने शेतकऱ्यांना धोका दिल्याचे म्हटले आहे.
दीड महिन्यापूर्वी खात्यावर २ हजार रुपये जमा झाल्याचा संदेश आला होता. मात्र आता बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो तर कळलं की, खात्यात रक्कम नाही, असं फिरोजाबाद येथील शेतकरी निरोत्तम सिंह यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिएकर जमीनीप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन टप्प्यात मिळणार होती. मात्र पहिल्या टप्प्यातील २ हजार मिळाल्यानंतर ते काढून घेण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.