Lok Sabha Elections 2019; नमो रथाला लागलं ग्रहण, उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:29 PM2019-03-11T13:29:23+5:302019-03-11T13:35:20+5:30
नमो रथाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत वस्तू तसेच फोटो यांच्या साहित्यांची विक्री केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नमो रथाला ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मागील वर्षी 4 मार्च रोजी नमो रथाला हिरवा कंदील दाखवला. या नमो रथाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत वस्तू तसेच फोटो यांच्या साहित्यांची विक्री केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या नमो रथाला ग्रहण लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या रथाच्या माध्यमातून होणाऱ्या साहित्य विक्रीत तोटा होत असल्याची माहिती आहे.
एका वाहनावर किती होता खर्च ?
नमो रथाला चालविण्यासाठी दिवसाकाठी जवळपास 8 हजार रूपये खर्च होतो. एकट्या दिल्लीमध्ये 8 नमो रथ चालविण्यात येतात. त्यामुळे दिवसाला 60 हजार रूपयांचा खर्च दिल्लीत नमो रथासाठी केला जातो. भाजपा मुख्यालयाबाहेर उभ्या करण्यात आलेल्या या वाहनांसाठी दिवसाला 5 हजार रूपये भाडे दिले जाते. या नमो रथासाठी वाहन चालक आणि 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहन चालकाला 1 हजार रूपये तर इतर 2 कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येकी 500 रूपये मानधन दिले जाते. त्याचसोबत या कर्मचाऱ्यांसाठी दोन वेळेचे जेवण, नाश्ता याचा खर्च वेगळा आहे. तसेच या नमो रथासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्चही वगळवण्यात आला आहे.
नमो साहित्याची किती होते विक्री ?
नमो रथावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघात फिरुन साहित्याची विक्री केली जाते. या रथाची करण्यात आलेली सजावट आणि साहित्य बघून नमो रथाला बघण्यासाठी ठिकठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र ज्यावेळी साहित्याची विक्री होत असल्याचे समजते त्यावेळी लोकं निघून जातात. खूप कमी प्रमाणात नमो रथात विक्री करण्यात येणारं साहित्य खरेदी करण्यात येते. रथातील छोट्या-छोट्या वस्तूंची विक्री जास्त होते. काही लोकं या नमो रथाला भारतीय जनता पार्टीचे प्रचार वाहन समजून यातील वस्तू मोफत मिळत असल्याची अपेक्षा ठेवून येतात. पैसे द्यावे लागत असल्याने पाठ फिरवून निघून जातात.
नमो रथात कोणते साहित्य विकले जातात ?
नमो रथ व्यवसायातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी निगडीत वस्तू विकल्या जातात. यामध्ये मोदी टी-शर्ट, बॅनर, टोपी, नमो मग तसेच वही, पेन, स्टीकर यासारख्या वस्तूंचा समावेश आहे.
नमो कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, नमो रथाच्या साहित्याची विक्री होत नाही हे खरे असले तरीही नमो रथाच्या फिरण्याने आमच्या व्यवसायाचा प्रचार होतो. या रथाच्या माध्यमातून लोकांना आम्ही उत्पादन करत असलेल्या वस्तूंची माहिती मिळते. त्याचसोबत कंपनी ऑनलाइन मार्केटमधूनही या वस्तूंची विक्री करते त्यामुळे कधी कधी आम्हाला एकाचवेळी लाखो रूपयांच्या सामनांची ऑर्डर मिळते. सोबतच देशातमध्ये आता निवडणुकीचे वातावरण असल्याने येणाऱ्या काळात याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.