नवी दिल्ली - आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी भाजपाने जाहीर केली आहे. या यादीत भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आल्यामुळे भाजपावर टीका होऊ लागली होती. मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपाच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले.
गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा निवडून आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आले. गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अडवाणी आमचे मार्गदर्शक आहेत आणि कायम मार्गदर्शक राहतील. लालकृष्ण अडवाणी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे त्यामुळे पक्ष त्यांचा आदर करते. मात्र अडवाणी यांनी वयाची 90 ओलांडली आहे. त्यामुळे वाढतं वय लक्षात घेता त्यांच्याजागी दुसऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगर मधून उमेदवारी देण्याचा निर्णय पार्टीने केला असं नितीन गडकरी यांनी सांगितले.
अटल-अडवाणी युग भाजपात संपुष्टात आल्याचा आरोप केला जातो मात्र युग कधी संपत नाही, पार्टी पुढे जात राहते मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा योग्य तो सन्मान राखला जातो असं गडकरींनी स्पष्ट केलं.
गांधीनगर मतदारसंघाचा इतिहास भाजपाच्या शंकरसिंह वाघेला १९८९ मध्ये येथून गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपाकडे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक लढविली. अटलबिहारी वाजपेयी १९९६ मध्ये विजयी झाले. पण लखनौमधूनही विजयी झाल्याने त्यांनी गांधीनगरचा राजीनामा दिला. नंतर पोटनिवडणुकीत भाजपाचेच हरिश्चंद्र पटेल निवडून आले. त्यानंतर पुन्हा लालकृष्ण अडवाणी यांनी हा मतदारसंघ राखला. गेल्या निवडणुकीमध्ये लालकृष्ण अडवाणी येथून ४ लाख ८३ हजार १२१ च्या मताधिक्याने विजयी झाले होते. हा मतदारसंघ भाजपाचा गड मानला जातो त्यामुळे अमित शहा यांना उमेदवारी देऊन भाजपाने शहा यांच्यावरील भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे.