रमजान महिन्यात निवडणुका टाळता येणार नाहीत, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 04:24 PM2019-03-11T16:24:20+5:302019-03-11T16:26:22+5:30
रमजान ईद आणि रमजान महिन्यात येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी मतदान ठेवण्यात आले नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर झाल्या आहेत. सात टप्प्यांमध्ये या निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, रमजान महिन्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम धर्मगुरुंनी लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. यावर निवडणूक आयोगाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. रमजान ईद आणि रमजान महिन्यात येणाऱ्या कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी मतदान ठेवण्यात आले नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दोन जूनपासून नवीन सरकारची स्थापना होण्याची गरज आहे. एका महिन्यात निडणुका होतील, असे शक्य नव्हते. संपूर्ण महिना वगळून निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, त्यामुळे रमजानचा विचार करूनच तारखा ठरवण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे या महिन्यातील सर्व शुक्रवार आणि मुख्य सणाचा दिवस वगळूनच मतदानाच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Election Commission: During #Ramadan, polls are conducted as full month can not be excluded. However, date of main festival and Fridays are avoided for poll days. #LokSabhaElections2019pic.twitter.com/i6NylD6WVB
— ANI (@ANI) March 11, 2019
दरम्यान, 6 मे पासून रमजानचा महिना सुरु होणार आहे. मुस्लिम समाजासाठी असणाऱ्या या पवित्र रमजान महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे. मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या लोकसभा निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे.
रमजानसारख्या पवित्र महिन्याची मुस्लिम समाज वर्षभर आतुरतेने वाट पाहतो. मुस्लिम समाजासाठी हा महिना पवित्र मानला जातो. यावेळी मुस्लिम रमजानचा रोजा ठेवतो, नमाज पठण करतो या काळात निवडणुकीत मतदान करणे शक्य होणार नाही, असे मते मुफ्ती असद कसमी यांनी मांडले आहे. याचबरोबर, मुस्लिम धर्मगुरु खालिद रशीद फरंगी यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर आक्षेत घेतला आहे. खालिद रशीद फरंगी यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान रमजाननंतर घेण्यात यावे अशी मागणीही केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने पुर्नविचार करावा अशी मागणी केली आहे.