नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चौकीदार या शब्दाला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचे कारणही तसेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वारंवार येणारा उल्लेख तो म्हणजे मी देशाचा पंतप्रधान नसून चौकीदार आहे, जो देशाचं संरक्षण आणि तिजोरीचे रक्षण करण्यासाठी जनतेचा सेवक म्हणून पदावर आहे. मात्र नीरव मोदी, विजय माल्ल्या आणि अनिल अंबानी यांना राफेलचं कंत्राट दिल्यावरुन काँग्रेसनेनरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार कॅम्पेन उघडलं. याच चौकीदार शब्दाचा वापर काँग्रेसकडून पुरेपूर प्रचारात वापर करण्यात आला. चौकीदार चोर है या घोषणेने राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
काँग्रेसने सोशल मिडीयातही चौकीदार चोर है असं कॅम्पेन उघडलं होतं याच कॅम्पेनला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून मै भी चौकीदार या कॅम्पेनची सोशल मिडीयात सुरुवात करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे नवीन नाव ठेवण्यात आलं आहे. त्याचपाठोपाठ भाजपच्या अनेक मंत्र्यांनी मोठ्या नेत्यांनी तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी देखील 'चौकीदार अमित शाह' असे नाव ठेवले आहे
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मै भी चौकीदार असा प्रमुख उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या घोषणेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं त्यामध्ये मोदी म्हणाले की, मी देशाची सेवा करण्यासाठी चौकीदार आहे. पण मी एकटा चौकीदार नाही तर भ्रष्टाचाराविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. जो देशाची प्रगती करण्यासाठी मेहनत करतोय, तो चौकीदार आहे. आज देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असं म्हणत मै भी चौकीदार ही मोहीम ट्विटरवर सुरु केली आहे.
भाजपच्या व्हिडीओनंतर काँग्रेसनेही त्याला उत्तर दिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये मै भी चौकीदार असं लिहून अनिल अंबानी, नीरव मोदी, विजय माल्ल्या, मेहुल चौकसी, गौतम अदानी यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर केलाय. सध्या ट्विटरवर चौकीदार फिर से, मै भी चौकीदार असं ट्रेंडींग पाहायला मिळत आहे.