Lok Sabha polls 2019: उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात मोदींविरोधी लाट, पश्चिम बंगाल, तामिळनाडू निर्णायक ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 04:53 AM2018-10-21T04:53:14+5:302018-10-21T04:53:34+5:30
लोकसभेच्या चाळीसपेक्षा जास्त जागा असलेल्या राज्यांमध्ये भाजप, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेत नाराजी आहे.
- टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : लोकसभेच्या चाळीसपेक्षा जास्त जागा असलेल्या राज्यांमध्ये भाजप, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जनतेत नाराजी आहे. त्याचे परिणाम नजीकच्या काळात पाहायला मिळतील आणि देशात पुन्हा भाजप सत्तेत येणार नाही, अशी भविष्यवाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव व खा. डी. राजा यांनी वर्तवली. दैनिक लोकमतच्या दिल्ली कार्यालयात त्यांनी संपादकीय विभागाशी संवाद साधला.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार व पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या चाळीसपेक्षा जास्त जागा आहेत. यापैकी तामिळनाडू व पश्चिम बंगाल वगळता राज्यात भाजप सत्तेत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सामान्यांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसेल, असा विश्वास डी. राजा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे सूचक वक्तव्य करून डी. राजा यांनी कुणासोबत चर्चा सुरू आहे, हा प्रश्न टाळला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सकारात्मक बदल दिसत आहेत. समविचारी, घटक पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध अत्यंत सौहार्दाचे आहेत, असे खा. राजा म्हणाले. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांची राजकारणातील जबाबदारी वाढली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
>महाराष्ट्राचा ऋणानुबंध
डी. राजा यांनी डावी चळवळ व महाराष्ट्राचा ऋणानुबंध सांगितला. रालोआच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रपती उमेदवारावर चर्चा सुरू होती. संपुआच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, डी. राजा व डाव्या पक्षाचे अन्य नेते बैठकीस उपस्थित होते.
अनेक नावांची चर्चा झाल्यावर आता आपल्याला कुणा महिलेचा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी विचार करायला हवा, असे डी. राजा यांनी सीताराम येचुरींना सांगितले. डॉ. मनमोहनसिंग यांनी सोनियांना प्रतिभाताई पाटील यांचे नाव सुचवले. शेजारी बसलेल्या कॉम्रेड ए.बी. वर्धन यांनी प्रतिभातार्इंचा संपूर्ण परिचय बैठकीत करून दिला.
बर्धनांच्या मराठी कनेक्शनमुळे प्रतिभातार्इंचा जीवनपटच जणू आम्हा सर्वांना त्या वेळी कळाला, अशी आठवण राजा यांनी कथन केली.