नवी दिल्ली - आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही, सपा-बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसाठी सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा आहे त्यावर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये असा इशारा दिला आहे.
मायावती यांनी ट्विट करत सांगितले की, काँग्रेसने 7 जागा सपा-बसपा आघाडीसाठी सोडल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसने हा गैरसमज पसरवू नये तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये असं आवाहन केले आहे. मायावती यांनी काँग्रेसला 80 जागांवर लढावं असं आव्हान दिलं आहे.
उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही, हे बहुजन समाज पार्टी नेत्या मायावती यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून उठवण्यात येत असलेल्या अफवांना आमचे कार्यकर्ते बळी पडणार नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशात सर्वच सर्व 80 जागांवर निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करुन स्वबळावर निवडणुका लढवाव्या. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी मिळून भारतीय जनता पार्टीशी लढण्यात पूर्णपणे सक्षम आहे.
रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी 2 जागा सोडण्याचा निर्णय घेतलाय, रायबरेली आणि अमेठी जागांवर सपा-बसपा आघाडी उमेदवार उभे करणार नाही. त्यामुळे सपा-बसपा यांच्या निर्णयाचा सन्मान राखत आम्ही देखील त्यांच्या आघाडीसाठी 7 जागांवर उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकारांना दिली.
सपा-बसपाने उत्तरप्रदेशमध्ये वेगळी चूल मांडल्याने लोकसभेची गणिते जुळविताना काँग्रेसला घाम फुटला आहे. यामुळे सपा आणि बसपाला महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या जागा सोडण्याचा विचारही काँग्रेस नेते करत होते. बसपाला महाराष्ट्रात 2 तर सपाला 1 लोकसभेची जागा सोडण्याचा विचार काँग्रेसचा होता, या खुष्कीच्या मार्गाद्वारे उत्तरप्रदेशमध्ये आघाडी होण्याची आशा काँग्रेसला वाटत होती मात्र मायावती यांनी केलेल्या ट्विटमुळे काँग्रेसची आशा धुळीस मिळाली आहे.