Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज, सोमवारी (20 मे) मतदान झाले. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील हॉट सीट असलेल्या रायबरेली येथे एका गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानावर बहिष्कार टाकणारे मिल एरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मैनुपूर गावचे ग्रामस्थ होते. ही माहिती मिळताच गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी काँग्रेस उमेदवार राहुल गांधी तिथे पोहचले.
दरम्यान, ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी आलेल्या राहुल गांधींसमोर गावकऱ्यांनी जय श्री राम आणि हर हर महादेवच्या घोषणा सुरू केल्या. या घोषणा सुरू होताच राहुल गांधींनी हात जोडून ग्रामस्थांना नमस्कार केला आणि तेथून निघून गेले.
भाजप उमेदवाराने समजूत काढण्याचा प्रयत्न केलाविशेष म्हणजे, भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनीही गावात पोहोचून ग्रामस्थांची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. गावात रस्ता न झाल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी ग्रामस्थांना रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधींच्या आश्वासनानंतर निम्म्या गावकऱ्यांनी मतदानास होकार दिला, तर निम्म्या लोकांनी समस्या सुटेपर्यंत मतदान करणार नसल्याचे म्हटले.
रायबरेली गांधी घराण्याचा बालेकिल्ला रायबरेली लोकसभा जागेसाठी पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. ही जागा गांधी घराण्याचा बालेकिल्ला आहे. 2004 पासून आतापर्यंत सोनिया गांधी येथून जिंकत आल्या आहेत. मात्र, यावेळी काँग्रेसने सोनिया गांधींच्या जागी राहुल गांधींना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे.