Rahul Gandhi : "भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:22 PM2024-04-15T17:22:01+5:302024-04-15T17:27:47+5:30
Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And BJP : राहुल गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला 'देशात एक नेता' हा विचार लादायचा आहे, असा आरोप केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज वायनाडमध्ये आहेत. या लोकसभा मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी सुलतान बठेरीमध्ये रोड शो केला. लोकांना संबोधित करताना राहुल यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला 'देशात एक नेता' हा विचार लादायचा आहे, असा आरोप केला. राहुल म्हणाले की, "भारत हा पुष्पगुच्छासारखा आहे आणि प्रत्येकाचा आदर केला पाहिजे कारण तो संपूर्ण पुष्पगुच्छाच्या सौंदर्यात भर घालतो."
"भारतात एकच नेता असावा, हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान आहे." राहुल यांनी वायनाडमधील कार्यकर्त्यांना आणि मतदारांना विचारलं की, भारतात एकापेक्षा जास्त नेते का असू शकत नाहीत? हीच विचारधारा काँग्रेस आणि भाजपामधील मुख्य फरक असल्याचा दावा राहुल यांनी केला. "काँग्रेसला देशातील लोकांचे ऐकायचे आहे आणि त्यांची श्रद्धा, भाषा, धर्म, संस्कृती यावर प्रेम आणि आदर करायचा आहे."
"भाजपाला वरून हे लादायचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे आपल्याला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालेले नाही. भारतावर स्वतःच्या लोकांनी राज्य केले पाहिजे अशी आमची इच्छा आहे" असं राहुल यांनी म्हटलं आहे. वायनाडमधून निवडणुकीच्या मैदानात पुन्हा नशीब आजमावत असलेले राहुल लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मतदारसंघात पोहोचले आहेत.
राहुल यांनी महिन्याच्या सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वायनाडमध्ये रोड शो करून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल वायनाडमधून 4,31,770 मतांच्या विक्रमी फरकाने विजयी झाले होते. केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागांवर 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज तमिळनाडूच्या निलगिरीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरची पाहणी केली. राहुल केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात जात होते.