नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांची तारीख जाहीर होताच, देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे. चला सशक्त आणि सुरक्षित भारत बनवूया असे म्हणत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार निवडणूक देण्याचं आवाहन मोदींनी ट्विटरद्वारे केले आहे. सबका साथ, सबका विकास या योजनेंतर्गत पुन्हा एकदा एनडीएला तुमचे आशीर्वाद हवेत, असे मोदींनी म्हटले आहे.
देशाचंच नव्हे तर जगाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक अखेर जाहीर झालं आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही हे मानाचं बिरूद मिरवणाऱ्या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. पहिल्या टप्प्याला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून 39 दिवसांत निवडणुका पार पडतील, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोडा यांनी जाहीर केले.
निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच, पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेचं आशीर्वीद मागितले आहेत. भाजप सरकारने आपल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात मुलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामे केली आहेत. सबका साथ, सबका विकास या संकल्पनेतून भाजपाने विकासाच्या माध्यमातून देशाला उभारण्याचं काम केलं आहे. गेल्या 70 वर्षांपासून रखडलेल्या कामांना या 5 वर्षात गती देण्याच काम आम्ही केलं. त्यामुळे आता, सशक्त आणि सुरक्षित भारत बनवूया, फिर एक बार मोदी सरकार अशी घोषणा देत पुन्हा एकदा भाजपप्रणित आघाडीला निवडूण देण्याचे आवाहन केले आहे.