नवी दिल्ली - BJP Candidate for Loksabha ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आज दुसरी उमेदवारी यादी जाहीर करू शकते. याआधी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा या राज्यांमधील जागांवर चर्चा करण्यात आली. १३ मार्चनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात भाजपासह काँग्रेस, तृणमूल काँग्रेसनेही उमेदवार यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या बैठकीत १०० जागांबाबत चर्चा करण्यात आली. त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत भाजपा लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपाने अद्याप महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, ओडिशा, तामिळनाडूसारख्या राज्यांमधील एकही उमेदवार जाहीर केले नाहीत. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये जागावाटपावरून अद्याप चर्चा सुरू आहे. पंजाबमध्ये अकाली दलासोबत तर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. या बैठकीत नितीन गडकरींना नागपूर, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, जालना रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा झाली. महाराष्ट्रातील २५ जागांबाबत भाजपाच्या बैठकीत चर्चा झाली असून ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात महायुतीत काही जागांवरून तेढ आहे. त्यात ५ जागांवरील उमेदवार बदलावे अशी मागणी भाजपाने शिंदेंच्या शिवसेनेकडे केली आहे. ठाण्यात संजीव नाईक, नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज, कोल्हापूरातून समरजित घाटगे किंवा धनंजय महाडिक, हातकणंगलेमधून विनय कोरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपाने शिंदेंकडे केली आहे. भाजपाकडून शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांना तिकीट देऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. त्यात हातकणंगलेचे धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम यवतमाळच्या भावना गवळी, मुंबई उत्तर पश्चिमचे गजानन किर्तीकर यांच्या नावाचा समावेश आहे.