PM Narndra Modi : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. गुरुवारी पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या आणंद येथे सभेदरम्यान काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. पाकिस्तानचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेलसा घेरलं. देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तान तिथे रडत आहे, पाकिस्तानचे प्रमुख काँग्रेससाठी प्रार्थना करत आहेत, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली. काँग्रेसने 60 वर्षात काय केले? बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, बँका ताब्यात घेतल्या, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आणंद येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार टीक केली. काँग्रेसचा शहजादा डोक्यावर संविधान ठेवून नाचत आहे. काँग्रेसच्या शहाजाद्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना केली जातेय. काँग्रेस देशात एकाच वेळी दोन संविधान आणि दोन झेंड्यांचा वापर करत होती. मी काश्मिरमध्ये तिरंगा फडकावून सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण केलं असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"एका चहावाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला ११ वरुन पाचव्या क्रमांकावर आणलं. आज परिस्थिती अशी आहे की गरिबांच्या नावावर बँकांचे राष्ट्रीयीकरण करूनही काँग्रेस सरकार कोट्यवधी गरिबांची बँक खाती उघडू शकलं नाही. मोदींनी 10 वर्षात कोट्यवधी गरिबांची बँक खाती उघडली. काँग्रेसने ६० वर्षात काय केले? बँकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि बँका ताब्यात घेतल्या.जेवढी वर्षे आपल्या देशात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा पाकिस्तान दादागिरी करत होता. मात्र आता दहशतीचे टायर पंक्चर झाले. ज्या देशाने एकेकाळी दहशतवाद्यांची निर्यात केली होती, तो देश आता पिठासाठी धावत आहे. ज्यांच्या हातात बॉम्ब होता, त्याच्या हातात आज भिकेचा कटोरा आहे," अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.
घरात घुसून आम्ही दहशतवाद्यांना ठार मारतो
"युपीएच्या काळात जेव्हा दहशतवादी हल्ले व्हायचे तेव्हा डॉसियर दिलं जायचं. डॉसियर म्हणजे सर्व माहिती गोळा करून फाइलवर दिली गेली. पण मोदींच्या भक्कम सरकारने डॉसियर-व्होझियरवर वेळ वाया घालवला नाही. घरात घुसून आम्ही दहशतवाद्यांना ठार मारतो. आता देशात काँग्रेसला दुर्बीण घेऊन शोधणंही कठीण झालं आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस मरत आहे आणि त्यांच्यासाठी पाकिस्तान रडत आहे. काँग्रेससाठी पाकिस्तानी नेते प्रार्थना करत आहेत. शहाजाद्याला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळं झालं आहे. काँग्रेस पाकिस्तानची चाहती आहे हे आपल्याला माहीत आहे. पाकिस्तान आणि काँग्रेसमधील ही जवळीक पूर्णपणे उघड झाली आहे,"असंही मोदी म्हणाले.
व्होट जिहादवरुन निशाणा
दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि त्यांची भाची मारिया आलम खान हिने दिलेल्या वोट जिहादच्या वक्तव्यावरही प्रत्युत्तर दिलं. इंडिया आघाडीच्या नेत्याने मुस्लिमांना व्होट जिहाद करण्यास सांगितले आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता व्होट जिहाद. काँग्रेसमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या कुटुंबाने व्होट जिहादची घोषणा दिली आहे. जिहाद म्हणजे काय आणि तो कोणाच्या विरोधात केला जातो हे तुम्हाला माहीत आहे. सर्व मुस्लिमांनी एकजुटीने मतदान करावे, असे इंडिया आघाडीचे म्हणणे आहे. इंडिया आघाडीने व्होट जिहादबाबत बोलून लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्याला विरोध केलेला नाही, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.