लोकसभेत चर्चेदरम्यान घड्याळ बंद पडताच सुमित्रा महाजन म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:17 PM2019-01-08T19:17:09+5:302019-01-08T19:18:48+5:30
गरीब सवर्णांना आरक्षण देणाऱ्या विधेयकावर चर्चा सुरू असताना घडला प्रकार
नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी मोदी सरकारनं लोकसभेत विधेयक मांडलं आहे. यावर सध्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना एक वेगळीच घटना घडली. काँग्रेस खासदार के. व्ही. थॉमस या विषयावर त्यांची मतं मांडत असताना लोकसभेतील घड्याळ बंद पडलं. ही बाब सदनातील एका सदस्यानं सभापती सुमित्रा महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर माझ्या हातात घड्याळ आहे. ते अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे चिंता करू नका, असं महाजन म्हणाल्या.
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी मांडण्यात आलेल्या विधेयकावर सत्ताधारी पक्षाकडून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काँग्रेस खासदार के. व्ही. थॉमस बोलण्यासाठी उभे राहिले. थॉमस स्वत:ची मतं मांडत असताना लोकसभेतलं घड्याळ 5 वाजून 10 मिनिटांवर बंद पडल्याची माहिती एका सदस्यानं सुमित्रा महाजन यांना दिली. यावर माझ्या हातातलं घड्याळ सुरू असल्याचं त्या म्हणाल्या. 'माझ्या हातात घड्याळ आहे. तुम्ही चिंता करू नका. माझं घड्याळ सुरू आहे. ते अगदी व्यवस्थित वेळ दाखवतं,' असं महाजन यांनी म्हटलं. यानंतर काही सदस्यांनी आपापसात बोलण्यास सुरुवात केली. त्यांना महाजनांनी चहा पिऊन येण्याचा सल्ला दिला.
याआधी सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत उपस्थित असलेल्या सदस्यांना दोन तासांमध्ये विधेयकावरील चर्चा संपवणार का, असा प्रश्न विचारला. त्यानंतर चर्चा कितीही वेळ सुरू राहू द्या. मला काहीच अडचण नाही, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. मोदी सरकारनं आणलेलं हे विधेयक म्हणजे निवडणुकीआधीचा जुमला असल्याची टीका अनेक माध्यमांकडून केला जात असल्याचं काँग्रेस खासदार थॉमस म्हणाले. त्यावर सभागृहानं हे विधेयक मंजूर करावं. मग हा जुमला ठरणार नाही, असा चिमटा महाजन यांनी काढला.