भगवान बाहुबली श्रेष्ठ समाजप्रवर्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 04:49 AM2018-02-20T04:49:56+5:302018-02-20T04:50:07+5:30
समाजात कालबाह्य रूढी-परंपरा, कुप्रथांना आस्थांचे रूप दिले जात आहे; पण सिद्ध व संत पुरुष या कुप्रथांना पायबंद घालून समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतात
शीतल पाटील
श्रवणबेळगोळ (कर्नाटक) : समाजात कालबाह्य रूढी-परंपरा, कुप्रथांना आस्थांचे रूप दिले जात आहे; पण सिद्ध व संत पुरुष या कुप्रथांना पायबंद घालून समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतात. देशातील संत परंपरा सर्वश्रेष्ठ असून, भगवान बाहुबली श्रेष्ठ समाजप्रवर्तक होते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काढले.
श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक सोहळ्यास पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी उपस्थिती लावली. विंध्यगिरी पर्वतावर नव्यानेच तयार करण्यात आलेल्या पादचारी मार्गाचे लोकार्पण व भगवान बाहुबली जनरल रुग्णालयाचे उद्घाटन चामुंडराय सभामंडपात मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यपाल वजूभाई वाला, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय योजना मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा, महोत्सव समितीच्या अध्यक्षा सरिता जैन, राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील उपस्थित होते.
मोदी म्हणाले, बारा वर्षांनी होणाºया भगवान बाहुबली स्वामी यांच्या मूर्तीवरील महामस्तकाभिषेक सोहळा काळात मी पंतप्रधानपदावर आहे, हे माझे सौभाग्य आहे. मुनी, आचार्य, माताजींचे आशीर्वाद घेण्यासाठी मी येथे आलो आहे. श्रवणबेळगोळ येथे भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलली आहेत. समाजात धार्मिक प्रवृत्ती अधिक आणि सामाजिक प्रवृत्ती कमी असल्याचा विचार अनेक जण मांडतात, पण त्यात तथ्य नाही. मुनी, आचार्य, संत-महंत, भगवंत समाजाच्या भल्यासाठी काम करतात. आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती या क्षेत्रात मुनी, संतांचे काम अजोड आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बाहुबली यांच्या स्तुतीमधील संस्कृत स्तोत्र म्हणून त्याचा हिंदीमध्ये अर्थही सांगितला. मी बाहुबलींना दररोज नमन करतो, असे मोदी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. चारूकीर्ती महास्वामी यांनी, पंतप्रधान मोदी यांना रजत कलश, सोनेरी ध्वज, सुवर्ण कलश, माहिती पुस्तिका व ग्रंथ देऊन गौरविले. श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारूकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या हस्ते रेखाचित्र भेट देण्यात आले. या वेळी ए. मंजू, केंद्रीय मंत्री अनंतकुमार, राज्यपाल वजूभाई वाला, सरिता जैन, डी. व्ही. सदानंद गौडा, पीयूष गोयल उपस्थित होते