‘त्या’ प्रकरणांत लव्ह जिहादचा संबंध नाही; अहवालाने उत्तर प्रदेश सरकारची पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 05:58 AM2020-11-25T05:58:13+5:302020-11-25T05:58:23+5:30
तरुणांना विदेशातून मदत मिळाल्याचे पुरावेही नाहीत
लखनऊ : आम्ही तपास केलेल्या कोणत्याही प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा दुरान्वयानेही संबंध नव्हता. ज्यांची आम्ही चौकशी केली त्या सर्वांनी निव्वळ प्रेमाखातर आंतरधर्मीय विवाह केल्याचे आम्हाला आढळून आले, असा अहवाल कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सादर केला आहे. विशेष म्हणजे जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरोधात कायदा आणण्याच्या तयारीत असलेल्या उत्तर प्रदेश सरकारची यामुळे चांगली पंचाईत झाली आहे.
विहिंप तसेच उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून कानपूर रेंजच्या पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुस्लिम तरुण त्यांच्याशी विवाह करतात आणि विवाहानंतर मुलींना जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडतात. त्यासाठी मुस्लिम तरुणांना परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. एसआयटीने यासंदर्भात केलेल्या तपासात असे काहाही होत नसल्याचा अहवाल सादर केला आहे. एकूण १४ प्रकरणांचा एसआयटीने तपास केला. मात्र, ‘लव्ह जिहाद’चा त्यांच्याशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचे तपासात आढळले. तसेच आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुस्लिम तरुणांना परदेशातून पैसे मिळाले असल्याचेही तपासात निष्पन्न झाले नसल्याचे अहवाल म्हणतो.